

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा. तसेच हा सिंहस्थ कुंभ डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील रस्त्यांचे बळकटीकरण करण्यात यावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बुधवारी (दि.26) सिंहस्थ आढावा बैठक झाली. गर्दीचे नियोजन, वाहतूक नियोजन तसेच सर्व्हेलन्ससाठी जास्तीत जास्त एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा. ज्या भागातून जास्त गर्दी होते त्या रस्त्यांवर गर्दीच्या नियोजनासाठी व भाविकांना वेळ घालविता यावा, यासाठी त्या ठिकाणी डिजिटल कुंभसंदर्भातील प्रदर्शन तयार करावे. सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या लोगो निर्माण करण्यासाठी स्पर्धा घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. सन 2015 मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माहितीचे विश्लेषण करून पुढील कुंभमेळ्यासाठी कसे नियोजन करता येईल, याचा अभ्यास करावा. सिंहस्थ दरम्यान गोदावरी नदीचे पाणी वाहते राहिले पाहिजे, जेणेकरून भाविकांना स्वच्छ पाण्यात स्नान करता येईल, यासाठी नियोजन करावे. तसेच साधुग्रामसाठी भूसंपादन, साधुग्राम व इतर महत्त्वाच्या ठिकाणी आरोग्य केंद्रे, अग्निशमन सुविधा आदीसंदर्भातही सुयोग्य नियोजन करून आराखडा तयार करावे. तसेच कुंभ कालावधीत नागरिकांपर्यंत माहिती जलदगतीने मिळण्यासाठी संपर्क यंत्रणा (पब्लिक अँड्रेस सिस्टीम) निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कुंभ कालावधीत काम करणाऱ्या मनुष्यबळास प्रशिक्षण देण्यात यावे. कुंभमेळ्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून त्यासाठीचे नियोजन करण्याची सूचना जलसंपदा मंत्री महाजन यांनी यावेळी केली.
सिंहस्थसाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे मुंबई, जव्हार, गुजरात, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, धुळे, पुणे, मुंबई अशा मार्गाने भाविक येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने त्या मार्गातील रस्त्यांचे बळकटीकरण करावे. त्या रस्त्यांवर वाहनतळांची सुविधा निर्माण करावी. कुंभ काळात नाशिक शहरात वाहने सोडण्यात येऊ नये. भाविकांसाठी वाहनतळ ते शहरात प्रवासासाठी ई बसचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. तसेच या ई बस प्रत्येक तीन मिनिटांना सुटतील असे नियोजन करावे. तसेच शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, ओझर या विमानतळावरही प्रवाशांचे नियोजन करावे. शिर्डी विमानतळावर विमाने थांबविण्यासाठी जागा वाढविण्यात यावी. तसेच ओझर विमानतळावरही अधिक विमानांचे लँडिंगसाठी सोय उपलब्ध करून द्यावी. नाशिक शहरात हेलिपॅड उभारता येतील का याचा विचार करावा. रेल्वे प्रशासनासाठी समन्वय साधून रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी नाशिक रोड, इगतपुरी, कसारा आदी स्थानकांमध्ये सोयी सुविधा निर्माण कराव्यात, असेही यावेळी त्यांनी सांगितले.