

नाशिक : गौरव अहिरे
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांनी नियोजन सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून शहर पोलिसांनी जिल्हाधिकार्यांकडे 1 हजार 112 कोटी रुपयांचा आर्थिक आराखडा सादर केला आहे. 2015 मधील कुंभमेळ्यासाठी पोलिसांनी सुमारे 59 कोटी 61 लाखांचा खर्च केला होता. त्या तुलनेत यंदा सुमारे 20 पट वाढीव खर्चाचा आराखडा पोलिसांनी सादर केला आहे.
शहरासह त्र्यंबकेश्वर येथे येत्या दीड वर्षात सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. 2015 मधील कुंभमेळ्यात शहरात 80 लाख भाविक - पर्यटकांनी हजेरी लावल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. येत्या कुंभमेळ्यात जगभरातून अंदाजे 3 ते 5 कोटी भाविक, पर्यटक येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे कुंभमेळा सुरू असताना कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल. त्यासाठी पोलिसांना मनुष्यबळासह सीसीटीव्ही, पोलिस चौक्या, बॅरेक्स, वॉच टॉवर्स, बल्ली-स्टील बॅरिकेडिंग, पी. ए. सिस्टीम, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बी.डी.डी.एस.), ड्रोन कॅमेरा, वाहने, पोलिसांना फूड पॅकेट्स आदी महत्त्वाची साधनसामग्री लागणार आहे. त्यासाठी शहर पोलिसांनी जिल्हाधिकार्यांकडे 549 कोटी 53 लाख रुपयांचा प्रस्तावित खर्च सादर केला आहे. वास्तविक आवश्यक खर्च 942 कोटी 53 लाख रुपयांचा अपेक्षित असून, त्यात 18 टक्के जीएसटीसह एकूण 1 हजार 112 कोटी 18 लाख रुपयांच्या खर्चाचा आराखडा सादर केला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात कायमस्वरूपी पोलिस चौक्या / बॅरेक्स उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे कुंभमेळ्यानंतरही शहरात आवश्यकतेनुसार पोलिस चौक्या उपलब्ध होतील. तसेच 2015 च्या कुंभमेळ्यात 11 कोटी 12 लाख रुपये खर्च करून 172 ठिकाणी 630 सीसीटीव्ही भाडेतत्त्वाने बसवले होते, तर आगामी कुंभमेळ्यासाठी सुमारे 400 कोटी रुपये खर्चून 2 हजार ठिकाणी 5 हजार सीसीटीव्ही बसवण्याबरोबरच 1 हजार बॉडी कॅमेरे व वाहनांवरील 100 कॅमेरे आवश्यक असल्याचा आराखडा पोलिसांनी मांडला आहे. त्यातील काही सीसीटीव्ही शहरात कायमस्वरूपी राहण्याची शक्यता आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘एआय’संलग्न सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. तसेच बॅरिकेडिंग, वाहने, बीडीडीएस पथके, वायरलेस उपकरणेदेखील येतील. तसेच पोलिस चौक्या, वॉच टॉवर, बॅरेक्स दुरुस्ती, नव्याने उभारले जातील. त्यामुळे कुंभमेळा झाल्यानंतर यातील बहुतांश उपकरणे, साधनसामग्री नाशिक शहरासाठी कायमस्वरूपी राहू शकेल. काही साहित्य राज्यभरात आवश्यकतेनुसार वितरीत केले जाईल.
चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, मुख्यालय, नाशिक