नाशिक : उत्तर प्रदेशातील प्रयागराज व मध्य प्रदेशातील उज्जैनच्या धर्तीवर नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी प्रशासनाने सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून नाशिक महापालिका तसेच त्र्यंबक नगरपालिकेतील अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी (दि.१५) उज्जैनच्या दोनदिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत. सिंहस्थात येणाऱ्या साधू-महंत व भाविकांसाठी उज्जैनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा, नदी घाट विकास तसेच विकासकामांची पाहणी या दौऱ्यात केली जाणार असून, त्यानुसार नाशिक-त्र्यंबकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचे नियाजेन केले जाणार आहे.
नाशिकमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने लाखो साधू-महंत व कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. या साधू-महंत व भाविकांसाठी विविध पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याची जबाबदारी महापालिकेची असणार आहे. त्यादृष्टीने महापालिकेने नियोजन सुरू केले असून, विविध विकासकामांचा समावेश असलेला सुमारे प्रारूप सिंहस्थ आराखडा जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. या आराखड्यातील प्रस्तावित कामांची छाननी सध्या विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून केली जात आहे. २०१५ मध्ये झालेल्या सिंहस्थकाळात डॉ. गेडाम हेच महापालिकेच्या आयुक्तपदावर कार्यरत होते. त्यामुळे आगामी सिंहस्थात विभागीय आयुक्त म्हणून डाॅ. गेडाम यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डॉ. गेडाम यांनी सिंहस्थाचे नियोजन आतापासूनच सुरू केले असून, त्याचाच एक भाग म्हणून नाशिक महापालिका व त्र्यंबक नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना उज्जैनमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कामांची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर आदी प्रमुख अधिकारी गुरुवारी दुपारी उज्जैनच्या दोनदिवसीय दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यादरम्यान महेश्वर येथेही पाहणी केली जाणार आहे.
नाशिकच्या अगोदर उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे २०२५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. तेथील सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारीदेखील पूर्ण झाली असून, सिंहस्थ कामांतर्गत नदी घाट विकासाबरोबरच अनेक मूलभूत विकासकामे प्रयागराज येथे उभी राहिली आहेत. साधू-महंतांसाठी साधुग्रामच्या उभारणीचे सुयोग्य नियोजन तेथे वर्षभराआधीच करण्यात आले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात प्रयागराजचा दौराही केला होता. मात्र या दौऱ्यातील बहुसंख्य अधिकारी महापालिकेतून सेवानिवृत्त झाले आहेत.