

नाशिक : प्रयागराज येथील सिंहस्थ कुंभमेळ्यात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. २०२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेला कुंभमेळा निर्विघ्न पार पडावा यासाठी राज्य शासनाने आतापासून पावलं उचलण्यास सुरूवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे गृह विभागाचे अवर मुख्य सचिव येत्या सोमवारी (दि.३) नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारीसह सुरक्षेचा आढावा घेणार आहेत.
बुधवारी (दि.२९) प्रयागराज येथे सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान अमृत स्नानाच्या मुहूर्तावर उसळलेल्या गर्दीत चेंगराचेंगरीची घटना घडली. यात ३० हून अधिक भाविकांचा मृत्यू तर ६० हून अधिक जण जखमी झाले. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्याची जोरदार तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातले आहे. नाशिकमध्ये २००३ मध्ये झालेल्या सिंहस्थातील दुसऱ्या पर्वणीकाळात चेंगराचेंगरी होऊन ३२ भाविकांचा बळी गेला होता. हा इतिहास लक्षात घेता आगामी कुंभमेळा अपघात मुक्त व्हावा यासाठी आतापासूनच राज्य शासनाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गृह विभागाचे अवर मुख्य सचिवांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक होत आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात काय दक्षता घ्यावी, सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना करता येतील, याविषयी या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीसाठी ३५ विविध आस्थापनांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम तसेच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.
महापालिका, पोलीस आयुक्तालय, महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राजमार्ग प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ, विद्युत वितरण कंपनी, उपविभागीय अधिकारी इगतपुरी-त्र्यंबेकश्वर, राज्य गुप्तवार्ता विभाग, जिल्हा शल्य चिकीत्सक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, मध्य रेल्वे विभाग, देवळाली कॅन्टोन्मेंट, पर्यटन विकास महामंडळ, पुरातत्व विभाग, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ अशा विविध ३५ शासकीय विभागांच्या प्रमुखांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे.