Nashik Kumbh Mela 2027 | कुंभमेळ्यासाठी कोटीच्या कोटी उड्डाणे, खर्चात पंधरापट वाढ

१५,१७२ कोटींचा आराखडा अंतिम
Nashik Kumbh Mela
सिंहस्थ खर्चात पंधरापट वाढ; १५,१७२ कोटींचा आराखडा अंतिमfile photo
Published on
Updated on

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असून, गत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तुलनेत यंदा प्रस्तावित सिंहस्थ कामांच्या खर्चात तब्बल १५ पटीने वाढ करत १५ हजार १७२ कोटींचा आराखडा अंतिम केला. त्यात रस्ते बांधणी व बांधकामाकरिता सर्वाधिक ३,९५२ कोटी ४६ लाखांची तरतूद केली असून, रिंग रोडसह साधुग्रामच्या भूसंपादनाकरिता ५,४२६.३४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा आराखडा विभागीय महसूल आयुक्तांना सादर केला जाणार आहे. सोमवारी (दि. ८) विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत या आराखड्याचा फैसला होणार आहे.

नाशिकमध्ये येत्या २०२७मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्यासंदर्भातील प्रशासकीय तयारी सुरू झाली असून, राज्य शासनाच्या निर्देशांनुसार नाशिक महापालिकेने सिंहस्थ आराखडा अंतिम केला आहे. सुरुवातीला महापालिकेने भूसंपादनासह १७ हजार १०० कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला होता. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आराखड्यातील खर्चाची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी प्रस्तावित सिंहस्थकामांची स्थळ पाहणी केली. त्यानंतर विभागनिहाय अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आराखडा अंतिम केला आहे. अंतिम आराखड्यामध्ये जवळपास दोन हजार कोटींची कपात करण्यात आली असून, भूसंपादनासह १५,१७२ कोटींचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय महसूल आयुक्तांना सादर केला जाणार आहे.

२००३ मध्ये २३० कोटी, तर २०१५ मध्ये १,०५२ कोटी ६१ लाख रुपयांच्या सिंहस्थ आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. आराखड्यात सर्वाधिक खर्च बांधकाम विभागासाठी दर्शविला आहे. गत सिंहस्थासाठी बांधकाम विभागाकरिता ५४१ कोटींची तरतूद होती. यंदा ३,९५२ कोटी ४६ लाखांची तरतूद प्रस्तावित केली आहे. गत सिंहस्थात रिंग रोड, साधुग्राम भूसंपादनाकरिता २०० कोटी होते. यंदा मात्र ५,४२६ कोटी ३४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी गत सिंहस्थात २० कोटींची तरतूद होती. यंदा २३८ कोटी प्रस्तावित केले आहेत. सार्वजनिक आरोग्य अर्थात मलनिस्सारण विभागासाठी गतवेळी २९.२५ कोटींची तरतूद होती. यंदा २,९३३ कोटी प्रस्तावित केलेत. पाणीपुरवठा योजनांच्या कामांच्या खर्चातही दहापट वाढ दर्शविली असून १,२५० कोटींची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

या विभागांसाठी प्रथमच तरतूद

उद्यान, माहिती व जनसंपर्क, सिटीलिंक, यांत्रिकी, पशुवैद्यकीय, माहिती व तंत्रज्ञान, वृक्षनिधी यांसाठी यंदाच्या सिंहस्थ आराखड्यात प्रथमच तरतूद करण्यात आली आहे. उद्यान विभागासाठी ५६ कोटी, माहिती व जनसंपर्क : २५ कोटी, सिटीलिंक : ७.९४ कोटी, यांत्रिकी : १६ कोटी, पशुवैद्यकीय : ५५.८२ कोटी, माहिती व तंत्रज्ञान एक कोटी, वृक्षनिधीसाठी १० कोटींची तरतूद केली आहे.

सिंहस्थासाठी ४३० कोटींचा सल्ला

सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेकडून सल्लागार संस्थेची नेमणूक केली जाणार आहे. विविध कामांसाठी तज्ज्ञांची मते, निरीक्षणे नोंदविली जाणार आहेत. त्यासाठी तब्बल ४३० कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने सिंहस्थ आराखड्यात केली आहे. गत सिंहस्थात राज्य शासनाकडून महापालिकेला ६३६ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले होते. या अनुदानातून ५० टक्क्यांहून अधिक सिंहस्थ कामे पूर्ण झाली होती.

भूसंपादनासाठी पर्यायांचा विचार

साधू-महंतांच्या निवास व्यवस्थेसाठी तपोवनात उभारल्या जाणाऱ्या साधुग्राम तसेच रिंगरोडच्या भूसंपादनाकरिता आराखड्यात ५,४२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर भूसंपादनासाठी शासनाकडून अनुदान मिळणे शक्य नाही. त्यामुळे सिंहस्थ भूसंपादनाकरिता शासनाकडून विशेष टीडीआरसारख्या पर्यायाचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news