नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मेळा अधिकाऱ्यासह ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. राज्यस्तरावरुन प्रस्तावावर कार्यवाही झाल्यानंतर तातडीने कुंभाच्या हालचाली गतिमान होणार आहेत.
२०२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यासाठी जिल्हास्तरीय स्वतंत्र कुंभमेळा कक्ष स्थापन केला जाईल. या कक्षात मेळा अधिकाऱ्यासह तब्बल ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव आहे.
२०२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. यंदाच्या कुंभमेळ्यात देश-विदेशातून पाच कोटी भाविक हजेरी लावतील, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये साधुग्राम, वाहनतळ यासह अन्य पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहे. विविध यंत्रणांच्या सहयोगातून ही कामे केली जाणार आहेत. त्यामुळे या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यासाठी जिल्हास्तरीय स्वतंत्र कुंभमेळा कक्ष स्थापन केला जाईल. या कक्षात मेळा अधिकाऱ्यासह तब्बल ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव आहे. मेळा अधिकाऱ्याची जबाबदारी ही अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या खांद्यावर असणार आहे. तसेच त्यांना सहाय्यक म्हणून प्रत्येकी दोन उपजिल्हाधिकारी व तहसीलदार नियुक्त असतील. याशिवाय लेखाधिकारी, क्लर्क यासह अन्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता कक्षात भासणार आहे.
गेल्या कुंभमेळ्याप्रसंगी जिल्हा प्रशासनाने उभारलेल्या कक्षात सर्व प्रकारचे मिळून २० अधिकारी व कर्मचारी नियुक्त होते. परंतु, २०२७ मध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून असणार आहे. त्यामुळे नियोजनात कुठेही कमतरता भासणार नाही याकडे प्रशासनाचा कल आहे. त्यादृष्टीने सिंहस्थ कुंभमेळा कक्षात ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्तीसाठी प्रशासन आग्रही आहे.