

नाशिक / मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १२ हजार १८१ कोटींच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत शुक्रवारी (दि. १३) मान्यता देण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील ५ हजार ९४० कोटी तर दुसऱ्या टप्प्यातील १७ हजार ४९ कोटींच्या कामांचा समावेश आहे. सिंहस्थासाठी देश-विदेशातून कोट्यवधी भाविक येणार आहेत. या माध्यमातून प्रत्येक भाविक भारताचे पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे या सिंहस्थ कुंभमेळ्याचे जगाला आकर्षण वाटेल, असे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुंबई येथील विधान भवनात सिंहस्थ शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, सरोज अहिरे, पंकज भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, राहुल ढिकले, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळ्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या कामांकरिता लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा. नाशिक वर्तुळ मार्गातील अडथळे दूर करीत विशेष बाब म्हणून ५० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी. सिंहस्थामध्ये स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून, या कामांमध्ये करण्यात येणारी शौचालय दर्जेदार असावी. सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकच्या परिसरातील स्थानकांची पायाभूत सुविधांची कामे रेल्वेच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये निफाड रेल्वेस्थानकाचाही समावेश करण्यात यावा, याबाबत रेल्वेने पडताळणी करून कार्यवाही करावी.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक शिर्डी व शनिशिंगणापूरला निश्चितपणे जाणार आहेत. त्यामुळे शिर्डी ते नाशिक रस्त्याचे काम करण्यात यावे. सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना संपर्कामध्ये कुठलीही अडचण होऊ नये, म्हणून मोबाईल संपर्काची व्यवस्था भक्कम असावी. त्यासाठी आतापासूनच तयारी करण्यात यावी. द्वारका जंक्शन येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांमध्ये अंतर्गत रस्त्यांचा विचार करून परिसरातील रस्त्यांचा एकीकृत विकास करावा. नवीन घाटांच्या जागेकरिता शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, यासाठी विशिष्ट पद्धतीचा अवलंब करावा. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त व नाशिक येथील गोदावरी नदीतील पाणी कुंभमेळा दरम्यान शुद्ध राहण्यासाठी यंत्रणांनी विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. बैठकीत नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सादरीकरण केले. बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (गृह) मनिषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होत्या. तसेच नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.
पुन्हा नवीन सीसीटीव्ही कॅमेरे घेणार
नाशिक येथील काळाराम मंदिराचे काम करताना आजूबाजूच्या वाहतुकीला अडथळा होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. राम काल पथायच्या कामाला गती देण्यात यावी. शहरातील ऑप्टिकल फायबर केबलचे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पातील नादुरुस्त सीसीटीव्ही बाबत पडताळणी करून नवीन सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची मान्यता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
पार्किंगसाठी महाविद्यालयांची मैदाने
अमृत स्नानांच्या दरम्यान भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता महाविद्यालयांमधील जागा पार्किंग तसेच पोलिसांसाठी घेण्याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून निर्णय घ्यावा. निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टच्या कामांचा समावेश करून पुढील कार्यवाही करण्यात यावी. नाशिक शहर व परिसरातील जवळपास दोन ते चार हजार मुलांना कुंभमेळ्याच्या निमित्ताने आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी प्रेरित करावे. महिला बचत गटांच्या कुंभमेळ्यातील समावेशाबाबत पडताळणी करून तशा पद्धतीचे बिझनेस मॉडेल उभारावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
सिंहस्थानिमित्त सुरू असलेली आणि प्रस्तावित असलेल्या कामांमध्ये कोणी वाईट हेतूने किंवा मुद्दाम विलंब होण्याच्या हेतूने अडथळा आणत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.