

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला प्रशासकीय पातळीवर वेग आला असून, मंगळवारी (दि. ७) महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी तपोवन, नियोजित साधुग्राम परिसर तसेच कुंभमेळा प्रशासकीय इमारत, सिटीलिंक बसडेपो, बेघर निवारा केंद्र, बटुक हनुमान मंदिर परिसराची पाहणी केली. परिसरातील अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
येत्या २०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्याच्या तयारीच्या दृष्टीने आयुक्त खत्री यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्यासमवेत तपोवन तसेच साधुग्राम परिसराची पाहणी केली. सिंहस्थात देश - विदेशातून लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होतील, त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. सिंहस्थ कुंभ महापर्वाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच, स्वच्छतेवर विशेष भर देत भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. अतिक्रमण निर्मूलन, आरोग्यसेवा आदी क्षेत्रांत महत्त्वपूर्ण नियोजन सुरू आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. रामवाडी येथील गोदा किनारी विकसित झालेल्या गोदा वॉक या उद्यानाची पाहणी आयुक्त खत्री यांनी केली.
भेटीदरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, उपआयुक्त (अतिक्रमण) डॉ. मयूर पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते.