नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भरभक्कम बहुमत असताना बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर विद्यमान सभापती देविदास पिंगळे यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आली आहे.
विरोधी गटाने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव विशेष सभेत १५ विरूध्द शून्य मतांनी मंजूर झाल्याने बाजार समितीतील पिंगळे पर्व तूर्तास संपुष्टात आले आहे. विशेष म्हणजे पिंगळे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करीत त्यांच्याच नेतृत्वाखालील संचालकांनी बंडाचा झेंडा फडकावत अविश्वास ठरावाचे सोपस्कार पार पाडले. या घडामोडीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या पिंगळे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत मंगळवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षेतखाली आणि बाजार समिती सचिव प्रकाश घोलप यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार झाली. सभेत पिंगळे यांच्या मनमानी कारभारांसह सहा मुद्द्यांवर संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात येऊन ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सभेला माजी सभापती शिवाजी चुंभळे, संपतराव सकाळे, उपसभापती माळेकर, युवराज कोठुळे, भास्कर गावित, जगन्नाथ कटाळे, सविता तुंगार, राजाराम धनवटे, तानाजी करंजकर, कल्पना चुंभळे, प्रल्हाद काकड, धनाजी पाटील, चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे, संदीप पाटील उपस्थित होते. पिंगळे यांसह उत्तम खांडबहाले व निर्मला विलास कड हे बैठकीस अनुपस्थित होते. (Nashik APMC)
पिंगळे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात तर विरोधी चुंभळे हे भाजपमध्ये राजकीय अस्तित्व राखून आहेत. चुंभळे यांच्या नेतृत्वाखालील १५ संचालकांनी पिंगळे यांच्यावर ३ मार्चला जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. बाजार समितीत मनमानी व हुकूमशाही पध्दतीने कामकाज असल्याच्या आरोप करत पिंगळे यांच्या पॅनलमधून निवडून आलेल्या संचालकांनी माजी सभापती चुंभळे यांच्या नेतृत्वाखाली अविश्वास ठराव दाखल केला होता. ज्या १५ संचालकांनी अविश्वास आणला त्यातील ११ संचालक मूळ अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे राज्यात महायुती सत्तेत असताना नाशिकमध्ये मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप अविश्वास प्रस्तावामुळे आमनेसामने आले.
दरम्यान, पिंगळे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजुरीनंतर उपसभापती विनायक माळेकर यांच्याकडे प्रभारी सभापतीपदाची धुरा आली आहे. माळेकर हे पिंगळे यांचे निकटवर्तीय मानले जातात. गत पंचवार्षिकमध्ये पिंगळे यांना सर्व संचालक सोडून गेले असताना माळेकर मात्र त्यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले होते. पिंगळे यांचे पॅनल विजयी करण्यात माळेकर यांचा महत्वाचा वाटा राहिला. तथापि, तिसऱ्या वेळी उपसभापतीपदाची संधी मिळालेल्या माळेकरांना कामकाजात विचारले जात नसल्याने ते नाराज होते. त्यामुळे ते बंडात सहभागी झाले.
दरम्यान, पिंगळे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर नवीन सभापती निवडीसाठी येत्या १९ मार्चला अर्थात रंगपंचमी दिनी संचालक मंडळाची विशेष सभा बोलविण्यात आली आहे. या सभेत नवीन सभापती निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात येईल. सभापतीपदासाठी शिवाजी चुंभळे यांचे नाव अंतिम झाले असून सभेत त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.