

नाशिक : काठे गल्ली सिग्नललगत असलेल्या हजरत सय्यद सातपीर बाबा दर्गासमोरील अतिक्रमण मनपा प्रशासनाकडून २२ फेब्रुवारी रोजी काढण्यात आले होते. या कारवाईबाबत छत्रपती संभाजीनगर येथील राज्य वक्फ न्यायाधिकरणामध्ये सोमवारी (दि. ३) सुनावणी झाली. यावेळी न्यायाधिकरणाच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त करत कारवाईमध्ये सहभागी असलेल्या मनपा अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी बुधवारी (दि. ५) सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
दर्गा अतिक्रमणाबाबत वक्फ न्यायाधिकरणात दावा दाखल असल्याने न्यायाधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश आदिल एम. खान यांच्या खंडपीठाने १३ नोव्हेंबर २०२४ साली मनाई हुकुम जारी केला होता. यामध्ये त्यांनी महापालिका प्रशासनाला अर्ज निकाली निघेपर्यंत या धार्मिक स्थळाभोवतालची कोणतीही रचना पाडण्यापासून तसेच ताबा व व्यवस्थापनात हस्तक्षेप करण्यास मनाई केली आहे. तरी देखील दर्गा समोरील वाढीव बांधकाम हे बेकायदेशीर असल्याचे सांगत महापालिकेने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणाचा काही भाग पाडला. त्यामुळे मनाई आदेश असतानाही महापालिकेने त्या जागेवर कारवाई का केली, दर्गा अनधिकृत ठरवण्याचा व अतिक्रमाण तातडीने काढण्याचा अधिकार महापालिकेस कोणी दिला असा सवाल करीत न्यायाधिकरणाने नाराजी वर्तवली. याबाबत मनपाच्या वतीने बाजू मांडणारे ॲड. पी. यू. वानकर यांनी आदेशाची नोंद घ्यावी, असेही न्यायाधिकरणाने म्हटले आहे.
मनाई आदेश असतानाही अतिक्रमण हटविण्याची कारवाई मनपाने केल्याने न्यायालयाने या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे मनपाची ही कारवाई वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. या कारवाईत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना बुधवारी न्यायाधिकरणासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.