

नाशिक : पुणे रस्त्यावरील, काठे गल्ली परिसरातील एका धार्मिक स्थळावरून दोन गटांत तणाव निर्माण झाल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने या स्थळाभोवती असलेले वाढीव अतिक्रमण हटविले तसेच पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांनी दोन्ही गटांशी चर्चा करीत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या स्थळाविषयी न्यायालयात प्रकरण दाखल असून, येत्या 3 मार्च रोजी याबाबतची सुनावणी असल्याने त्याकडे दोन्ही गटांचे लक्ष लागून आहे.
काठे गल्ली परिसरातील कॅमल हाउसला लागून असलेल्या सिडनी टॉवरशेजारील हजरत सय्यद सातपीर बाबा दर्ग्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे शनिवारी (दि. २२) दिसून आले. दर्गा अनधिकृत असल्याचा दावा करीत, तो तत्काळ हटविण्याची मागणी केली होती. दुसरीकडे दर्गा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह मुस्लीम संघटनांनी एकत्र येत दर्गा अधिकृत असून, वक्फ बोर्डाच्या मालकीचा असल्याचे सांगत कारवाईला विरोध केला होता. दोन्ही गट आमनेसामने आल्याने, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शनिवारी (दि. २२) सकाळपासूनच परिसरात दोन्ही गटांकडून गर्दी केल्याचे दिसून आले. वाढता तणाव लक्षात घेता, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने 7 वाजताच घटनास्थळी धाव घेत, दर्ग्यालगतचे वाढीव अतिक्रमण हटविले. यावेळी शहर-ए-खतीब व माजी नगरसेवक बबलू पठाण यांनी दर्ग्यास भेट देऊन दर्ग्याला कुठलाही धक्का लागला नसल्याची खात्री केली.
दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जोपर्यंत अतिक्रमण पूर्णपणे हटविले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देत घटनास्थळीच ठिय्या दिल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांची धरपकड केली. मात्र, नंतर ठिय्या आंदोलनात आमदार देवयानी फरांदे, आचार्य तुषार भोसले यांनी सहभाग घेत अतिक्रमण हटविण्याची मागणी लावून धरली. तत्पूर्वी मुस्लीम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासमवेत बैठक घेत या दर्ग्याबाबतची कागदपत्रे सादर केली.
मुस्लीम संघटनांची बाजू जाणून घेतल्यानंतर आमदार फरांदे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्यासमवेत बैठक घेत, दर्ग्याबाबतच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच कारवाई करण्याबाबतचे धोरण निश्चित केले जाणार असल्याचे आयुक्त खत्री यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ३ मार्च रोजी याप्रकरणी न्यायालयात सुनावणी असल्याने, त्याकडे दोन्ही गटांचे लक्ष लागून आहे.
जोपर्यंत अतिक्रमण पूर्णपणे हटविले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा महंत सुधीरदास पुजारी यांनी दिल्यानंतर पोलिसांनी महंतांसह १० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते, तर महंत अनिकेत शास्त्री यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
पहाटे ४ पासूनच पोलिसांनी या भागात नाकाबंदी करीत मोठा बंदोबस्त तैनात केला होता. यासाठी परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता. तीन एसआरपीएफच्या तुकड्यांनी खडा पहारा दिला होता. सर्व वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी उपस्थित होते. बंदोबस्त यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनास्थळी भेट देत, पोलिसांचे कौतुक केले. हा बंदोबस्त पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे आयुक्त कर्णिक यांनी स्पष्ट केले.
घटनास्थळी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. जोपर्यंत अतिक्रमण हटविले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचा इशारा देत, कार्यकर्त्यांनी सामुदायिक हनुमान चालीसा पठण केले. यावेळी जय श्रीरामच्या घाेषणाही देण्यात आल्या.
वक्फ मंडळाने शुक्रवारी (दि. २१) पोलिस आयुक्तांना पत्र लिहीत, समाज माध्यमांवर दिशाभूल करणारे तसेच दोन समाजांत तेढ निर्माण करणारा मजकूर व्हायरल केला जात आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता, आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.
धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून मागील २५ वर्षांपासून स्थानिक नागरिक पाठपुरावा करीत आहेत. २० ऑगस्ट २००० रोजी कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीने जनरल अरुण कुमार वैद्य यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त आणि महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला निवेदन दिले होते. निवेदनात हे बांधकाम हटविण्याची मागणी केली होती.
जागेच्या सातबाऱ्यावर महापालिकेचे नाव असल्याने, महापालिका न्यायालयात आपले म्हणणे मांडणार आहे. या जागेवर जुनी मजार असून, अतिरिक्त सहा पीर या ठिकाणी बांधण्यात आले आहेत. पीरचा आकार वेगळा असल्याने, सर्वेक्षकांकडून कागदपत्रांची योग्य छाननी करून पूर्वीचा पीर निश्चित करून उर्वरित सहा पीर महापालिका किंवा त्या समाजाकडून हटविण्याबाबतच्या सूचना दिल्या जातील. त्यामुळे आम्ही सात दिवस थांबणार आहोत.
देवयानी फरांदे, आमदार
दर्गा ट्रस्टने २०१० मध्ये रीतसर वक्फ बोर्डाकडे नोंदणी केली असून, ही मिळकत वक्फ मिळकत म्हणून नोंदणीकृत आहे. दर्गा अधिकृत असून, या प्रकरणात न्यायालयीन स्थगिती आदेश असताना महापालिकेने कुठलीही नोटीस न देता कारवाई केली. या जागेच्या सातबारावर दर्ग्याची नोंद आहे. असे असूनही महापालिकेने विश्वासघात केला. महापालिकेच्या बेकायदेशीर कारवाईविरोधात कायदेशीर लढा लढणार आहोत.
तबरेज इनामदार, चेअरमन, हजरत सय्यद सातपीर दर्गा ट्रस्ट
धार्मिक स्थळ वादामुळे पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केला होता. द्वारकाकडून नाशिक रोडकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. याशिवाय नाशिक रोडकडून येणारी वाहतूक समाजकल्याण कार्यालयापर्यंत बंद केली होती. त्यामुळे द्वारका सिग्नल येथे वाहतुकीचा मोठा भार पडल्याचे दिसून आले. दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ७ पासून ते दुपारी 3 पर्यंत वाहतूक मार्ग बंद असल्याने, वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली.
पोलिसांनी पहाटे 4 पासून बंदोबस्त ठेवला होता. परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केल्याने, ताब्यात घेतलेल्यांची भूमिका तपासून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. नाशिककरांनी पोलिसांना केलेल्या सहकार्याबद्दल आभार.
संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.