

Mumbai-Nashik highway Traffic Block
इगतपुरी : मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात दोन कंटेनरमध्ये झालेल्या विचित्र अपघातामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. एका उभ्या कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या कसारा घाटात एक कंटेनर उभा होता. त्याचवेळी, मागून आलेल्या दुसऱ्या कंटेनरने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, एक कंटेनर महामार्गावर आडवा झाला, ज्यामुळे घाटातील मार्ग पूर्णपणे बंद झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
खबरदारीचा उपाय म्हणून, जुन्या कसारा घाटातील वाहतूक लतिफवाडी येथून नवीन घाटामार्गे वळवण्यात आली आहे. टोल प्रशासनाच्या तीन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करून मार्ग मोकळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. वाहतूक पूर्ववत होण्यास काही वेळ लागण्याची शक्यता असल्याने, प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.