

नाशिक : मुलाला शासकीय नाेकरी लागल्याचे बनावट नियुक्तिपत्र देत तिघांनी मिळून एकाला आठ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घातला. १२ सप्टेंबर २०२३ पासून तिघांनी मिळून हेमराज गंगाराम गायकवाड (४८, रा. सटाणा) यांची आर्थिक फसवणूक केली.
गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार, संशयित बाळू दादा जाधव (रा. दुडगाव, ता. जि. नाशिक), मुन्ना सोन्या कुंवर आणि शरद दत्तात्रय राजगुरू उर्फ पाटील यांच्याविराेधात सरकारवाडा पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमराज हे आश्रमशाळेत कामाठी म्हणून कार्यरत असून, त्यांच्या मुलाने एमएसडब्ल्यूसह डी.एड. पर्यंत शिक्षण केले आहे. हेमराज हे मुलाला नोकरी मिळण्यासाठी प्रयत्नशील होते. कामानिमित्त १२ सप्टेंबर २०२३ राेजी ते शहरात सीबीएस येथे आले असता, त्यांची संशयितांशी ओळख झाली. त्यावेळी तिघांनी मिळून मुलाला शासकीय नोकरी लावून देतो. मात्र, त्यासाठी पैसे लागतील, असे सांगितले होते. त्यानुसार मुलाची लिपिक व टंकलेखकपदी निवड झाली असून, मुंबईतील जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्याचे पत्र देत गायकवाड यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सिन्नर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालयात मुलाची नियुक्ती झाल्याचे पत्रही संशयितांनी दिले. या पत्रावर कार्यालयाचा जावक क्रमांक १४६२ टाकून ३० ऑक्टोबर २०२३ रोजी दिलेल्या बनावट पत्रावर उपजिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी व स्टॅंप होता. हे नियुक्तिपत्र देत संशयितांनी गायकवाड यांच्याकडून तीन लाख रुपये रोख स्वरूपात, तर पाच लाख ३५ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले. दरम्यान, गायकवाड यांनी मुलाच्या नोकरीबाबत सखाेल चौकशी केल्यावर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस अधिक तपास करीत आहे.