

जानोरी ( नाशिक ) : राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील दहावा मैल (जानोरी फाटा) येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेसला थांबा देण्याची मागणी प्रवाशांसह ग्रामस्थांकडून होत आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर दहावा मैल सध्या वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र होत आहे. जानोरी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने अनेक प्रवाशांना विमानतळावर जाण्यासाठी ओझर येथे उतरावे लागते किंवा विमानतळाहून नाशिकला जावे लागते. त्यामुळे प्रवाशांचा जास्त वेळ जातो. मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंडही बसतो. या ठिकाणी परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेस थांबत नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. महामंडळाने लांब पल्ल्याच्या बसेसला दहावा मैल येथे थांबा दिल्यास विमानतळावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांना सोयीचे होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
जानोरी फाटा हा विमानतळावर जाण्यासाठी महत्त्वाचा थांबा आहे. या ठिकाणी जर लांब पल्ल्याच्या बसेस थांबल्या, तर प्रवासाच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे.
कुणाल बागूल, ग्रामपंचायत सदस्य, जऊळके दिंडोरी
दहावा मैल बसथांबा येथे जळगाव, धुळे, मालेगाव येथे जाणाऱ्या बसेस थांबत नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. परिवहन महामंडळाने येथे विनंती बस थांबा देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी.
गणेश तिडके, ग्रामपंचायत सदस्य, जानोरी