Nashik news | आयटी कंपनीत लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती मोठी; मंत्री गिरीश महाजन

IT company harassment case Maharashtra | इतर कंपन्यांतही तपासाची गरज
Girish Mahajan
Girish Mahajan
Published on
Updated on

नाशिक : येथे उघडकीस आलेल्या आयटी कंपनीतील कथित लैंगिक शोषण व धर्मांतर प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून, या प्रकरणाची सर्वंकष चौकशी सुरू असल्याची माहिती राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या घटनेवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत दोषींवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

मंत्री महाजन म्हणाले की, या प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. नाशिक पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा विस्तार मोठा असू शकतो, त्यामुळे सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. या आयटी कंपनीत छळवणूक, धार्मिक दबाव व धर्मांतरास भाग पाडण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप असून, मुलींना विशिष्ट आहार घेण्यास भाग पाडणे, धार्मिक प्रथा पाळण्यास सांगणे आणि जबरदस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

ब्लॅकमेलिंग आणि रॅकेटचा संशय

या प्रकरणात चार ते पाच जणांच्या टोळीमार्फत मुलींना नोकरीचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले जात होते. त्यानंतर त्यांचे फोटो व व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करून त्यांचा छळ करण्यात येत होता. पीडित मुलींना त्यांच्या मैत्रिणींनाही या जाळ्यात आणण्यास भाग पाडले जात होते. त्यामुळे हे एक संघटित रॅकेट असल्याचा संशय महाजन यांनी व्यक्त केला आहे.

पीडितांना पुढे येण्याचे आवाहन

या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही माफी दिली जाणार नाही, असे स्पष्ट करीत मंत्री महाजन यांनी, पीडितांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले आहे.

मुलींचेच नव्हे, मुलांचेही धर्मांतर

मंत्री महाजन यांनी सांगितले की, या प्रकरणात केवळ मुलींचेच नव्हे, तर मुलांचेही धर्मांतर केल्याचे समोर येत आहे. नोकरी व पैशाचे आमिष दाखवून त्यांना धर्म बदलण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोप महाजन यांनी केला. इतक्या मोठ्या नामांकित कंपनीत असे प्रकार सुरू होते, ही गंभीर बाब आहे. तिथल्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे महाजन यांनी सांगितले. ते म्हणाले की, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग समोर येण्याची शक्यता असून, परिसरातील इतर कंपन्यांमध्येही असे प्रकार घडत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे व्यापक तपास करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news