नाशिक : शहर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान व तपासणीत दोन ठिकाणांहून ३१ लाख ५० हजार रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. प्राथमिक तपासानंतर या पैशांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आयकर विभागाशी संपर्क साधला आहे. त्यानुसार या पैशांचा तपास आता आयकर विभाग करीत आहे.
उपनगर पोलिस ठाणे हद्दीत हृषिकेश माधव वानखेडे (रा. माणिकनगर, भालेराव मळा, जय भवानी रोड) या बिगारी कामगाराच्या घरात ११ लाख रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने उपनगर पोलिसांना आढळले होते. पोलिसांनी मशीनवर पैशांची मोजदाद करीत रोकड जप्त केली. प्राथमिक तपासात शेती विकल्यानंतर हे पैसे आल्याचे हृषिकेश वानखेडे याने पोलिसांना सांगितले. मात्र शेती विक्रीची कागदपत्रे त्याच्याकडे नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ही रोकड जप्त करून आयकर विभागाला कळवले गेले, तर दुसऱ्या घटनेत सातपूर पोलिस ठाणे हद्दीतील पिंपळगाव बहुला येथे नाकाबंदी दरम्यान, एस.एस.टी. पॉइंट येथे नेमलेल्या पथकाने वाहन तपासणी करताना एमएच १४ केए ५१८४ क्रमांकाच्या वाहनात २० लाख ५० हजार रुपयांची रोकड आढळून आली. वाहनातील संशयित महेश शरद गिते याच्याकडे पैशांबाबत चौकशी केली असता, त्याने पैशांबाबत समाधानकारण उत्तर दिले नाही. त्यामुळे पोलिसांनी ही रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी या पैशांचाही तपास आयकर विभागाकडे सोपवला आहे. त्यानुसार आयकर विभाग या दोन्ही घटनांमधील जप्त रोकडचा तपास करीत आहे.