

सिडको (नाशिक): राजेंद्र शेळके
अंबड औद्योगिक वसाहतीमधील सुमारे 125 पथदीप मागील दोन आठवड्यांपासून बंद असल्यामुळे कामगार, वाहनचालक व स्थानिक उद्योजकांना अंधारात ये- जा करावी लागत आहे. तसेच सुमारे 100 पथदीप पोल सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे कधीही ते जमिनीवर पडून दुर्घटना घडू शकते. मनपाने बंद पथदीप सुरू करावे व सडलेले पोल तत्काळ बदलावे अशी मागणी उद्योजक, कामगारांनी केली आहे.
मनपाने औद्योगिक वसाहतीमधील पथदीपांचा मेन्टेनन्स टाटा कंपनीकडे दिला आहे. औद्योगिक वसाहत चुंचाळे- अंबड गाव व परिसरातील मळे तसेच कॉलनी भागात सुमारे १२५ पथदीप बंद आहेत. एकतर या भागात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच सध्या पावसाचे दिवस असल्याने खड्ड्यात पाणी साचून अपघात होत आहेत. अंधाराचा गैरफायदा घेत चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. बंद कंपनीतून चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. तसेच दुचाकी व चारचाकी वाहने चोरी होत आहेत. अंधाराचा फायदा घेत चोरट्यांकडून लूटमारीच्या घटना वाढल्या आहेत. अंबड औद्योगिक वसाहत भागात सुमारे १०० हून अधिक पथदीप सडलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यात जोरदार वाऱ्यामुळे हे पोल पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपाने पोल बदलून टाकण्याची मागणी उद्योजक, कामगार व नागरिकांनी केली आहे.
मनपाने व संबंधित टाटा कंपनीने लक्ष घालून अंबड औद्योगिक वसाहतीत बंद असलेले पथदीप त्वरित सुरू करावे.
ललित बुब, अध्यक्ष आयमा
अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये खराब व सडलेले विद्युत पोल पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्वरित नवीन पोल उभारावेत.
राजेंद्र पानसरे, उपाध्यक्ष, आयमा
अंबड औद्योगिक वसाहतीत रस्त्यांवर २४ तास वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या भागातील बंद पथदीप त्वरित सुरू केले पाहिजे.
राहुल आरोटे, जिल्हाध्यक्ष, भाजप कामगार आघाडी
बंद पथदीप सुरू करण्यासाठी मेन्टेनन्स विभागाला सूचना दिल्या आहेत. तसेच खराब पोल बदलण्यासाठी मनपा मुख्य कार्यालयाकडे प्रस्ताव दिला आहे.
मोहन गिते, उपअभियंता, मनपा विद्युत विभाग, सिडको