

नाशिक : प्रगत उत्पादन क्षेत्रात कामगारांना सक्षम करण्यासाठी टाटाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स आणि नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर निमा अध्यक्ष आशिष नहार आणि टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे सीएफओ मयांक पलान यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
टाटाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (आयआयएस)चे सल्लागार श्रीनिवासन यांनी नुकताच नाशिकचा दौरा केला होता. त्यावेळी निमा पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन, टाटाने 'निमा'त स्किल सेंटर सुरू करावे अशी विनंती केली होती. त्यास श्रीनिवासन यांनी सकारात्मकता दर्शवून निमा पदाधिकाऱ्यांना मुंबईतील टाटांचे कौशल्य विकास केंद्र पाहण्यासाठी निमंत्रित केले होते. त्यानंतर निमा शिष्टमंडळाने मुंबईला जाऊन स्किल सेंटरची पाहणी केली होती. दरम्यान, गुरुवारी (दि. २९) सातपूर येथील निमा हाउस येथे याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे टाटा समूहाशी निमाचे नाते अधिक दृढ होणार असल्याचे स्टार्टअप इंडियाचे श्रीकांत पाटील यांनी सांगितले, तर टाटातर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मशीनवर प्रशिक्षण दिले जाते, असे आयआयएसचे प्रकल्प व्यवस्थापक श्रेयस पाटकर आणि मुख्य प्रशिक्षक एस. जगन्नाथन यांनी सांगितले. याप्रसंगी निमा उपाध्यक्ष के. एल. राठी, मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, अखिल राठी, वैभव नागशेठिया, कैलास पाटील आदी उपस्थित होते.
हा करार म्हणजे नवीन औद्योगिक पर्वाचा प्रारंभ असून, नाशिकला औद्योगिक क्षेत्रात वेगळ्या उंचीवर नेण्यास मदत होणार आहे. नाशिकमध्ये कुशल कामगारांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. आता या स्किल सेंटरमुळे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल.
आशिष नहार, अध्यक्ष, निमा, नाशिक.
नाशिकच्या औद्योगिक जगताला आंतरराष्ट्रीय दर्जाचे जास्तीत जास्त मनुष्यबळ स्किल सेंटरद्वारे उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. या स्किल सेंटरच्या माध्यमातून उद्योगाला कुशल मनुष्यबळ मिळण्यास मदत होईल.
मयांक पलान, मुख्य वित्तीय अधिकारी, टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स