

नाशिक : गोदरेज या नामांकित कंपनीची उपकंपनी असलेल्या 'गोदरेज निन्जा' दिंडोरी तालुक्यात तब्बल ५०० कोटींची गुंतवणूक करणार आहे.
४० एकर जागेत हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, कंपनीमार्फत पाळीव प्राण्यांच्या पशुखाद्याचा नवा ब्रॅण्ड सादर केला जाणार आहे. पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने ही गुंतवणूक होणार असून, या प्रकल्पातून दरवर्षी तीस हजार टन पशुखाद्याची निर्मिती केली जाणार आहे.
'गोदरेज'ची उपकंपनी असलेल्या 'गोदरेज पेट केअर'चे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबर्ट मेन्झिस यांनी आगामी राष्ट्रीय पाळीव प्राणी दिनानिमित्त (११ एप्रिल) चेन्नईत याबाबतची घोषणा केली आहे. गोदरेज पेट केअरने 'गोदरेज निन्जा' हा पाळीव पशुखाद्याचा नवा ब्रॅण्ड सादर केला आहे. हा ब्रँड पेडिग्री आणि ड्रूल्स यांसारख्या आघाडीच्या ब्रँडशी थेट स्पर्धा करणार असल्याचेही रॉबर्ट मेंझीस यांनी स्पष्ट केले. दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे गोदरेज केटल जेनेटिक्स हा प्रकल्प पूर्वीपासूनच कार्यरत असून, त्याचाच तब्बल ४० एकर जागेत विस्तार केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच नाशिकच्या कृषी, औद्योगिक व आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.
दरम्यान, नाशिकची मदर इंडस्ट्री असलेला 'महिंद्रा ॲण्ड महिंद्रा' लवकरच आपल्या प्रकल्पाचा इगतपूरी तालुक्यात विस्तार करणार असून, तब्बल पाचशे एकर जागेवर प्रकल्पाचा विस्तार केला जाणार आहे. उद्योगमत्र्यांनी या प्रकल्पासाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश एमआयडीसीला दिले असून, त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया सुरू असतानाच 'गोदरेज'नेही प्रकल्पाची घोषणा केल्याने नाशिकच्या उद्योग क्षेत्राच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, या प्रकल्पाबाबतची घोषणा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबर्ट मेन्झिस यांनी समाज माध्यमांवरून केली असून, एमआयडीसी किंवा जिल्हा उद्योग केंद्राकडे याबाबतची कोणतीच माहिती उपलब्ध नाही.
या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे ३० हजार टन पाळीव प्राण्यासाठी पशुखाद्य तयार केले जाणार आहे. 'गोदरेज निन्जा' पाळीव प्राण्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खाद्य तयार करणार आहे. सध्या देशात सुमारे तीस दशलक्ष पाळीव प्राणी असून, त्यांच्यासाठी पाकीटबंद खाद्याचा वापर अद्यापही कमी होतो. केवळ दहा टक्के पाळीव प्राण्यांसाठीच हे खाद्य वापरले जाते. त्यामुळे या क्षेत्रात विकासाची मोठी संधी असल्याचे मेन्झिस यांनी चेन्नईत सांगितले.
गोदरेज निन्जाचा हा प्रकल्प केवळ आर्थिक गुंतवणुकीपुरता मर्यादित नसून, स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी घेऊन येणार आहे. 'महिंद्रा'पाठोपाठ हा जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे.
मनीष रावल, उपाध्यक्ष, निमा, नाशिक.