

नाशिक : त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम इस्टेट येथे ६ ते ९ डिसेंबरदरम्यान आयोजित 'निमा इंडेक्स-२०२४' या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चार दिवसीय प्रदर्शनाचे शुक्रवारी (दि. ६) सकाळी ११ वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून दीपक बिल्डर्सचे चेअरमन दीपक चंदे, एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी, जिंदाल सॉ. लि.चे अध्यक्ष व्ही. चंद्रशेखरन, प्रायोजक टीडीकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रबल रे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक अमित कुमार, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी. बी. सिंग उपस्थित असणार आहेत.
सहा वर्षांच्या कालखंडानंतर प्रदर्शन होत असून, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याबरोबरच उद्योजकांना आपली उत्पादने जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर पाठविण्याची संधी उपलब्ध व्हावी, नवोदित उद्योजकांना त्यांचे कलाविष्कार सादर करता यावे, नवीन स्टार्टप्सना प्रोत्साहन मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रदर्शन भरविण्यात आले आहे. जास्तीत जास्त लोकांनी प्रदर्शनास भेट देऊन उद्योजकांचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले. प्रदर्शनातील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, आयटीएस, ऑफिस ऑटोमेशन, अपारंपरिक उर्जा, बँकिंग, विमा, वित्त, शिक्षण, पर्यटन तसेच खास आकर्षण म्हणजे ईव्ही व एआयची विविध उत्पादनांचे स्टॉल्स विशेष आकर्षण असणार आहे. प्रदर्शन यशस्वीतेसाठी सचिव निखिल पांचाळ, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव मनीष रावल, आशिष नहार, राजेंद्र अहिरे, दिलीप वाघ, हेमंत खोंड, कैलास पाटील, नितीन आव्हाड आदी प्रयत्नशील आहेत.
----