

देवळा : नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये जिल्हयातील अवैध व्यावसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्यात येत आहे. त्यानूसार शुक्रवारी दि. २९ रोजी देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंजाळ नगर ते सुभाष नगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या रिफिलींग करणाऱ्या सेंटरवर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे.
देवळा पोलीस ठाणे हद्दीत सुभाषनगर पारिसरात काही संशयीत इसम हे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापरकरीता वापर होणारे निळे गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलींग करत असल्याची बातमी स्थानिक पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकातील अधिकारी , अंमलदार यांनी याठिकाणी छापा टाकला असता, संशयीत भागवत कारभारी जाधव, (वय ४२, रा. सुभाषनगर, रामेश्वर फाटा, ता देवळा )हा घरगुती गॅस सिलेंडरमधुन व्यापारी गॅस सिलेंडरमध्ये धोकादायक ठरेल अशा पध्दतीने गॅस रिफिलींग करत होता. त्याचे विरूध्द देवळा पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाई मध्ये घरगूती वापराचे १०१ गॅस सिलेंडर, व्यापारी वापराचे निळे रंगाचे ३५ गॅस सिलेंडर असे एकूण १३६ गॅस सिलेंडर, इलेक्ट्रीक वजनकाटा, गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे ०२ पिस्टन पंप व इलेक्ट्रीक मोटर, तसेच ०२ चारचाकी वाहने असा एकूण ११,१५,४०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक .राजु सुर्वे, .पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि दत्ता कांभीरे, पोहवा सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, सुभाष चोपडा, शरद मोगल, योगेश कोळी यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.