

इगतपुरी (नाशिक) : इगतपुरी रेल्वेस्थानकात दुपारी आलेली लखनऊ-लोकमान्य टिळक टर्मिनस एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस तब्बल तीन तास थांबवून ठेवल्याने संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मास्तरांच्या केबिनमध्ये घुसत त्यांना घेराव घातला. प्रवाशांच्या रौद्ररुपानंतर गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकहून आलेली लखनऊ-लोकमान्य टिळक टर्मिनस एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस सोमवारी (दि. 24) दुपारी तब्बल साडेतीन तास इगतपुरी स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती. या गाडीमागून आलेल्या गाड्या पुढे सोडल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशनमास्तरांच्या केबीनमध्ये जात गाडी तत्काळ सोडण्याची मागणी करत गोंधळ घातला. गाडी थांबवून ठेवण्याचे ठोस कारण प्रशासन सांगत नसल्याने प्रवासी अधिक संतप्त झाले. प्रवाशांनी स्टेशन मास्तरला धारेवर धरले. प्रवाशांच्या रौद्ररुपामुळे अखेर साडेतीन तासांनी गाडी इगतपुरी स्थानकातून मुंबईकडे रवाना करण्यात आली. मात्र, कसारा घाटात काही अंतरावर ही गाडी पोहोचताच ती पुन्हा थांबविल्याने प्रवासी अधिक संतप्त झाले होते.
इगतपुरी येथे रेल्वेचे कसारा घाटात अप लाइनवर व मिडल लाइनवर अचानक दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी काही काळ ब्लॉक घेण्यात आल्याने गाड्यांना सोडायला उशीर झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. अप लाइनवर गाडी उभी असताना पाठीमागून येणाऱ्या गाड्या मिडल लाईनद्वारे वळविण्यात येऊन पुढे थांबविण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांच्या मनात मागच्या गाड्या पुढे सोडल्याची भावना निर्माण होऊन ते चिडले. त्यातच काम पूर्ण झाल्यावर पुढे टीजीआर एकच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे गाड्यांना अजून उशीर झाला. सिग्नल यंत्रणा दुरुस्त झाल्यानंतर व घाटातील काम संपल्यानंतर सोमवारी (दि. 24) सायंकाळी साडेचारनंतर गाड्या मुंबईच्या दिशेने नियमित रवाना झाल्या. घाटात गोंधळ होऊ नये, म्हणून लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले.