

नाशिक : महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत शहरातील ५७१ खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली असून ४५ रुग्णालयांत रुग्ण हक्क सनद न लावणे, दरपत्रक दर्शनी भागात नसणे तसेच परवाना नूतनीकरण न केल्याच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या असून येत्या १५ दिवसात संबधित रुग्णालयांनी त्रुटींची पूर्तता न केल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द केला जाणार आहे.
दरपत्रक, सनद दर्शनी भागात नसणे- २७
प्रदूषण नियंत्रण मंडळाची वैधता नसणे- १२
अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला नसणे- ६
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने रुग्णांवरील उपचारांबाबतचे दर निश्चित करीत हे दरपत्रक रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात लावण्याचे बंधन घातले होते. कोरोनाकाळात याची यशस्वी अंमलबजावणी झाली असली तरी, तिसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णालयातील दरपत्रकही गायब झाले होते. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने त्याचाच आधार घेत २०२१ मध्ये महाराष्ट्र शूश्रुषा अधिनियमात सुधारणा करीत खासगी रुग्णालयांनी रुग्णालयाच्या दर्शनी भागात दरपत्रक व रुग्णहक्क सनद लावणे बंधनकारक केले होते. त्यासंदर्भातील सर्व आदेश राज्यातील खासगी रुग्णालयांसह त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना यासंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. परंतु, त्याचीही अंमलबजावणी होत नाही.
नाशिकमधील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार वैद्यकीय विभागाने शहरातील ५७१ रुग्णालयांना तीन वेळा पत्रके काढून रुग्णालयाच्या दर्शनी भागात दरपत्रक तसेच रुग्णहक्क सनद लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, या रुग्णालयांनी त्याला केराची टोपली दाखवली. त्यामुळे वैद्यकीय विभागाने पथकामार्फत या रुग्णालयांची तपासणी केली असता यात ४५ रुग्णालयांमध्ये नियमांचे उल्लंघन होवून गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे या रुग्णालयांना अंतिम सुधारणा करण्यासाठी पंधरा दिवसांची नोटीस बजावण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४५ खासगी रुग्णालयांना महाराष्ट्र सुश्रुषा अधिनियम, सुधारीत २०२१ नुसार नोटिसा बजावण्यात आल्यात आहे. पंधरा दिवसांच्या मुदतीत त्रुटींची पूर्तता न केल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द केला जाईल.
डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी, नाशिक महापालिका.