

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गर्दी, गडबड आणि धावपळीच्या युगात प्रामाणिकपणा हरवत चालल्याची खंत अनेकदा व्यक्त केली जाते. मात्र, नाशिकमध्ये घडलेल्या प्रसंगाने माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय दिला. रिक्षात चुकून राहिलेली २५ लाखांचे सोने व रोख रक्कम असलेली बॅग परत करून रिक्षाचालकाने आपले कर्तव्यच पार पाडले. रायपूर (छत्तीसगड) येथील सराफ व्यावसायिक प्रवीणचंद सोनी (५७) हे पत्नी, आई आणि मुलीसह श्री काळाराम मंदिर व कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी नाशिकला आले होते. मात्र, त्यांचा प्रवास काही क्षणांतच चिंतेत बदलला होता. रेल्वेने नाशिकला आल्यानंतर त्यांनी शहरात येण्यासाठी बसचा आणि त्यानंतर गंगास्नानासाठी रिक्षाचा प्रवास केला. मात्र, गोदावरी घाटावर उतरताना त्यांच्या हातून मोठी चूक घडली. त्यांच्या ताब्यातील बॅग रिक्षामध्येच राहून गेली. गंगास्नान आटोपून जवळपास तासाभरानंतर त्यांना बॅगेची आठवण झाली. विशेष म्हणजे त्या बॅगेत तब्बल ६३४ ग्रॅम वजनाची दोन सोन्याची बिस्किटे आणि ४३ हजार रुपयांची रोकड होती. जवळपास एक कोटी रुपयांचा हा मौल्यवान ऐवज हरवल्याचे लक्षात येताच संपूर्ण कुटुंब हादरले होते. त्यांनी तातडीने परिसरातील पोलिसांकडे धाव घेतली. दुसरीकडे, रिक्षाचालक देवीदास शिवदास देशमुख (५८) यांनी रिक्षात राहिलेली बॅग पाहिली. संपत्तीचा मोह न बाळगता त्यांनी ती थेट सरकारवाडा पोलिस ठाणे गाठत जमा केली. त्यावेळी पोलिस ठाण्यात हवालदार चंदर दळवी, संदीप उघडे, रोशनी भांबरे उपस्थित होते. त्यांनी रिक्षाचालकाकडून सविस्तर माहिती घेत इतर पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारीबाबत पडताळणी सुरू केली. दरम्यान, वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड, पोलिस निरीक्षक कैलास राऊत, निरीक्षक विजय तलवारे यांच्या उपस्थितीत बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यावेळी बॅगेत दोन सोन्याची बिस्किटे आणि ४३ हजार रुपयांची रोकड आढळून आली. बॅगेतील ऐवज पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. याचवेळी सोनी हे पंचवटी ठाण्यात बॅगेची तक्रार नोंदविण्यासाठी आले होते. सरकारवाडा ठाण्यात बॅग जमा झाल्याची माहिती मिळताच त्यांना तेथे बोलावण्यात आले. पोलिसांनी व्यापारी आणि रिक्षाचालक यांची भेट घडवून आणली. आवश्यक खातरजमा केल्यानंतर संपूर्ण मुद्देमालासह बॅग सोनी यांच्या ताब्यात देण्यात आली. हरवलेली संपत्ती परत मिळाल्यानंतर सोनी यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्यांनी रिक्षाचालक देवीदास देशमुख यांचे मनापासून आभार मानले. तसेच त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना यथायोग्य बक्षीस देण्याची इच्छाही व्यक्त केली होती. पोलिसांनीही देवीदास देशमुख यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या प्रामाणिकपणाचा गौरव केला.
एक कोटीचा ऐवज समोर असूनही मोहाला बळी न पडता, तो मूळ मालकाच्या स्वाधीन करणाऱ्या देवीदास देशमुख यांनी इतरांसाठी अनमोल संदेश दिला आहे. सोन्यापेक्षाही मौल्यवान असते, ती माणसाचा प्रामाणिकपणा हे त्यांनी दाखवून दिले आहे. - सुरेश आव्हाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सरकारवाडा