

नाशिक : अडथळे दूर करणारा आणि नशीब बदलणारा देव म्हणून विघ्नहर्ता गणरायाची ओळख आहे. त्याचे आगमन म्हणजे प्रत्येकावरील विघ्न दूर करणारे असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे गणेशोत्सव पर्वात जो-तो विघ्नहर्त्याची मनोभावे पूजा करताना दिसून येतो. अशात राजकारणी विशेषत: आमदारकीचे स्वप्न बाळगून असलेली मंडळी विघ्नहर्त्याच्या चरणी लीन होणार नसले, तरच नवल. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी गणेशोत्सवाची संधी साधून बाप्पा तसेच स्वत:ची छबी झळकवून प्रचाराचा बिगुल फुंकला आहे. मात्र, तिकीटप्राप्तीचे विघ्न दूर करून बाप्पा नेमका कोणाला पावणार? याची मात्र एकच चर्चा मतदारांमध्ये रंगत आहे. (With the upcoming assembly elections just a few days away, aspirants have started campaigning in full swing to showcase themselves in the nomination race)
आगामी विधानसभा निवडणुकीला काही दिवसच उरल्याने, इच्छुकांनी उमेदवारीच्या रेसमध्ये स्वत:ला दाखविण्यासाठी जोरात प्रचार सुरू केला आहे. गणेशोत्सवाचे निमित्त साधून इच्छुकांनी मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात बाप्पा तसेच स्वत:ची छबी असलेले होर्डिंग्ज झळकविले आहेत. एकाच चौकात, एकाच पक्षातील विद्यमान आमदारांसह चार ते पाच इच्छुकांचे होर्डिंग्ज झळकत असल्याने, उमेदवारीची लॉटरी नेमकी कोणाला लागणार अशी चर्चा मतदारांमध्ये रंगत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती एकत्र निवडणूक लढविणार असल्याने, उमेदवारी जाहीर करताना सर्वच पक्षांचा कस लागणार आहे. प्रत्येक मतदारसंघात महायुती आणि मविआतील प्रत्येकी तिन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवारीसाठी दावा ठोकून आहेत. नाशिक पूर्व, पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघांत भाजपचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, या तिन्ही मतदारसंघांत भाजपकडूनच इच्छुकांची यादी मोठी असल्याने, आमदारांपेक्षा इच्छुकांमध्येच 'होर्डिंग्ज वॉर' जोरात सुरू असल्याचे दिसत आहे. याशिवाय मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकदेखील मैदानात असल्याने, बाप्पा नेमका कोणाला पावणार? अशी चर्चा रंगत आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही अशीच स्थिती आहे. नाशिक पश्चिम आणि मध्यमध्ये अगोदरच उबाठा गटाच्या इच्छुकांनी आपली उमेदवारी जाहीर केल्याने, मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे महायुतीसारखीच मविआमध्येही तिकिटासाठी रस्सीखेच होणार असल्याने, बाप्पा नेमके कोणाचे तिकिटाचे विघ्न दूर करणार? अशी चर्चा मतदारांमध्ये रंगत आहे.
भाजपसह काँग्रेस, दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची यादी मोठी असून, जवळपास सर्वांनाच वरिष्ठांनी शब्द दिल्याचा दावा या मंडळींकडून केला जात आहे. 'कामाला लागा, तुम्हालाच तिकीट फिक्स' अशा स्वरूपाचा शब्द दिल्याचे ही मंडळी सांगत आहेत. प्रत्यक्षात तिकीट कोणाला मिळणार? हे येत्या काळात स्पष्ट होईलच.
आपल्या मतदारसंघातील प्रत्येक सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी आरतीसाठी जाण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ असलेली बघावयास मिळत आहे. काहींनी तर मंडळांकडे आरतीसाठी येण्याची इच्छा स्वत:हून व्यक्त केली आहे. त्यासाठी वर्गणीही दिली आहे. यामुळे मंडळ पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ उडत असला, तरी त्या-त्या दिवसाच्या प्रसादाची व इतर खर्चाची तरतूद होत असल्याने, मंडळांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.