मनमाड : मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रविवारी (दि. ७) मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला असून, मुंबईकडे जाणारी आणि तिकडून येणारी वाहतूक विस्कळीत झाली. लांब पल्ल्याच्या काही गाड्या मनमाड येथून पुणेमार्गे तर काही गाड्या जळगाव येथून सुरतमार्गे वळविण्यात आल्या. काही गाड्या मनमाडपर्यंत आल्यानंतर येथे रद्द करण्यात आल्या. परिणामी, प्रवाशांचे कमालीचे हाल होऊन त्यांना त्रास सहन करावा लागला. त्यातील अनेकांना सी-टीएटी परीक्षेला मुकावे लागले.
मध्य रेल्वेच्या वाशिंद व खडवली स्थानकांदरम्यान मुसळधार पाऊस, दरड कोसळणे, रेल्वे मार्गाखालील खडीचा भराव वाहून जाण्याच्या घटनांमुळे मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वे वाहतूक रविवारी (दि. ७) रोजी विस्कळीत झाली होती. मुंबईकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस नाशिकरोड स्थानकात थांबविण्यात आली. मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या ११ रेल्वेगाड्यांची वाहतूक पुणे, दौंडमार्गे वळविण्यात आली आहे. काही रेल्वेगाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवून माघारी वळवण्यात होत्या. तर या मुसळधार पावसाचा फटका परीक्षार्थींनाही बसला असून अनेकांना सी-टीएटी परीक्षेला मुकावे लागले.
मुंबईसह इतर भागांत पावसाने सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले, तर काही ठिकाणी रुळावर झाड आणि दरड कोसळली. त्याचा परिणाम मुंबईकडे ये - जा करणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर झाला. रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. काही गाड्या मनमाड येथून दौंड, पुणे मार्गे, तर काही गाड्या जळगाव येथून सुरतमार्गे मुंबईकडे वळविण्यात आल्या. काही गाड्या येथूनच रद्द केल्या गेल्या. या नैसर्गिक आपत्तीने रेल्वे प्रवाशांची तारांबळ उडाली. स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. नाशिक, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना तर मोठा त्रास सहन करावा लागला. काही प्रवासी माघारी फिरले, तर काहींनी खासगी वाहनाने प्रवासाचा पर्याय निवडला. उत्तर भारतातून ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
प्रवाशांना माहिती देण्यासाठी मनमाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तीनवर मदत कक्ष सुरू करण्यात आले असून, गाडी रद्द झाल्यानंतर प्रवाशांना तिकिटाची संपूर्ण रक्कम परत करण्यात आली. रेल्वेचे अधिकारी पी. एल. मीना, एसीपी कांबळे, विवेक भालेराव, विवेक भाटी, अजय बढोडिया, दीपककुमार दास, अभिषेक त्रिपाठी, मुकेश कुमार आदी उपस्थित होते. त्यांनी प्रवाशांना मार्गदर्शन केले.
रविवारी (दि. ७) नाशिक येथे केंद्रीय शिक्षक पात्रता (सी-टीएटी) परीक्षा होती. त्यासाठी जळगाव जिल्ह्यासह खानदेश भागातून अनेक विद्यार्थी रेल्वेने जात होते. मात्र ती गाडी अचानक मनमाडला रद्द केल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकले. काहींनी महामंडळाच्या बस, खासगी प्रवासी वाहनांचा पर्याय निवडला. मात्र, वेळेचे गणित चुकल्याने त्यासाठी दिवसच परीक्षेचा ठरला. रेल्वे स्थानकावरील मदत कक्षातून माहिती घेतल्यानंतर, गाडी रद्द झाल्याने पैसे परत घेण्यातही अनेकांचा वेळ खर्ची पडला. त्यात काहींना परीक्षेवर पाणी सोडावे लागले.
नाशिकला रविवारी(दि. ७) दुपारी २ वाजता सी- टीएटीची परीक्षा होती. त्यानुसार खानदेशमधील परीक्षार्थींनी रेल्वेचे गणित जुळवले होते. मात्र मनमाडला येताच रेल्वे रद्द झाल्यामुळे परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांनी, आम्हाला परीक्षा देण्याची पुन्हा संधी देऊन तसे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी या ठिकाणी केली.