

नाशिक : उत्तर महाराष्ट्राची अर्थवाहिनी असलेल्या दि नासिक मर्चन्ट्स को- ऑप. बँकेच्या चेअरमनपदी हेमंत धात्रक यांची बिनविरोध निवड झाली. गुरुवारी (दि. २४) बँकेच्या प्रशासकीय इमारतीत निवड प्रक्रिया पार पडली. धात्रक यांच्याकडे तिसऱ्यांदा बँकेची धुरा सोपविण्यात आली आहे.
खासदार राजाभाऊ वाजे, ज्येष्ठ संचालक विजय साने, धनराज चौधरी, गुरमित बग्गा, कोंडाजी आव्हाड, दत्ता गायकवाड, जयंत जायभावे आदींची यावेळी गौरवपर भाषणे झाली. मावळते चेअरमन सोहनलाल भंडारी म्हणाले की, आजची उपस्थिती मोठी असून, धात्रक यांच्यावर असणारा विश्वास बँकेची प्रगती दर्शविणारा आहे. माजी आ. वसंत गिते यांनी, नामको बँकेचे टीमवर्क चांगले असल्याने बँकेची प्रगती होऊ शकली असे सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते पुंजाभाऊ सांगळे, दामोदर मानकर, लक्ष्मण जायभावे, शिवाजी चुंभळे, शैलेश कुटे, प्रकाश घुगे, गोकुळ गिते, व्हा. चेअरमन सुभाष नहार, जनसंपर्क संचालिका सपना बागमार, आकाश छाजेड, ललितकुमार मोदी, अविनाश गोठी, अशोक सोनजे, प्रफुल्ल संचेती, प्रशांत दिवे, तानाजी जायभावे, विशाल जातेगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.
बँकेला ६५ कोटींचा नफा मिळणे, हे सामुदायिक योगदान आहे. स्वतःच्या मालकीचे डेटा सेंटर व्हावे यासाठी २००६ साली प्रयत्न करत, दिवंगत गोपीनाथ मुडे यांच्या हस्ते डेटा सेंटरचे उद्घाटन केले. आजमितीस ५२ मल्टिस्टेट बँका असून, बँकेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भरीव काम करायचे आहे. बॅंकेचे पाच हजार कोटी ठेवींची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कार्यक्षम राहू. गृह, वाहन, शैक्षणिक, वैयक्तिक कर्ज ग्राहकांना कसे लवकर मिळेल यासाठी प्रयत्नशील राहण्याबरोबर जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न आहे.
हेमंत धात्रक, नवनिर्वाचित चेअरमन, नाशिक.