

देवळा (नाशिक) : देवळा तालुक्यातील खामखेडा गावात सोमवारी (दि. ९ जून) सकाळी काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना घडली. अंगणात खेळत असलेल्या अवघ्या दोन वर्षांच्या देवांशी आकाश सोज्वळ या चिमुरडीचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
खामखेडा येथील कोळी वाडा वस्तीवरील भाऊसाहेब महादू सोज्वळ यांची नात आणि आकाश सोज्वळ यांची कन्या देवांशी, सकाळी साडेदहाच्या सुमारास अंगणात खेळत होती. त्यावेळी तिची आई घरकामात व्यस्त होती. खेळता-खेळता देवांशी कधी घराजवळील पाण्याच्या टाकीकडे गेली, हे कुणालाही समजले नाही. काही वेळाने तिचा आवाज न आल्यामुळे आईने शोध घेतला असता, ती टाकीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.
तातडीने तिला खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश ठाकरे यांनी तिला मृत घोषित केले.
दोन वर्षांच्या निरागस देवांशीच्या आकस्मिक मृत्यूने सोज्वळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण खामखेडा गावात हळहळ व्यक्त केली जात असून, गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत.