

जळगाव: चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी आता भरदिवसा घरांवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. हातगाव (ता. चाळीसगाव) येथे चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील तब्बल १ लाख १९ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला. यात सोन्याच्या दागिन्यांसह मोठ्या रकमेचा समावेश आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हातगाव येथील रहिवासी जयाबाई गोकुळ आव्हाड यांच्या घरी ही चोरी झाली. १० तारखेला दुपारी १२.०० ते ३.४५ वाजेच्या दरम्यान, अवघ्या पावणेचार तासांच्या अवधीत चोरट्यांनी आपला 'हात'सफाईचा खेळ केला. अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाच्या ड्रॉवरमधील ऐवजावर डल्ला मारला.
असा मारला डल्ला
चोरट्यांनी कपाटातील १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ६३ हजार ७०० रुपयांचा सोन्याचा नेकलेस आणि ४६ हजार १०० रुपयांची रोकड असा एकूण १ लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
नागरिकांकडून गस्त वाढवण्याची मागणी
घरी परतल्यावर फिर्यादी जयाबाई आव्हाड यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ चाळीसगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. जयाबाई आव्हाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे चोरट्यांचा मुजोरपणा वाढल्याचे दिसून येत असून, पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.