Nashik Harihar Kapaleshwar Sundarnarayan temple| हरि-हर भेटीतून शैव-वैष्णव परंपरांचा संगम

मध्यरात्री कपालेश्वर-सुंदरनारायण मंदिरात भाविकांची मांदियाळी; गोदाघाटावर भक्तीचा जागर
कपालेश्वर-सुंदरनारायण मंदिर
कपालेश्वर-सुंदरनारायण मंदिर
Published on: 
Updated on: 

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

देवदिवाळी अर्थात वैकुंठ चतुर्दशीच्या पर्वावर गोदाघाट परिसरात शिव आणि विष्णू उपासनेचा अनोखा संगम घडविणारा पारंपरिक 'हरि-हर भेट' सोहळा सोमवारी (दि. २३) मध्यरात्री उत्साहात पार पडला. श्रीकपालेश्वर महादेव मंदिर आणि श्री सुंदरनारायण मंदिर यांच्यातील या धार्मिक परंपरेने शैव आणि वैष्णव संप्रदायातील ऐक्याचा संदेश दिला. ढोल ताशांचा निनाद, फटाक्यांची लक्षवेधी आतषबाजी आणि 'हरी हरी व बम बम भोले'च्या घोषाने परिसर भक्तिमय झाला. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

हरि-हर भेटीनिमित श्रीकपालेश्वर महादेव मंदिर देवस्थान संस्थानतर्फे धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. भगवान विष्णू आणि महादेवाचे पूजन, नवग्रह स्थापना तसेच महाविष्णू याग आदी विधी पार पडले. मंदिर परिसरात

फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मध्यरात्रीच्या मुख्य सोहळ्यासाठी कपालेश्वर महादेवाच्या शिवपिंडीला हरि-हर स्वरूपाचा शृंगार करण्यात आला होता. शिव आणि विष्णू या दोन्ही देवतांच्या एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविक आतुर होते.

गोदावरी तीरावरील श्रीकपालेश्वर आणि सुंदरनारायण या दोन्ही मंदिरांना नाशिकच्या धार्मिक आणि ऐतिहासिक वारशांत महत्त्वाचे स्थान आहे. सुंदरनारायण मंदिराची उभारणी पेशवेकालीन सरदार गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी १७५६ मध्ये केल्याचा ऐतिहासिक संदर्भ आढळतो. मंदिराच्या वास्तुरचनेत मराठा काळातील मंदिर स्थापत्याबरोबर तत्कालीन शैलींचा प्रभाव दिसून येतो. गोदावरी परिसरात समोरासमोर असलेल्या शिव आणि विष्णू मंदिरांमधील हरि-हर भेटीची परंपरा नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक वैशिष्ट्यांमध्ये भर घालते.

परंपरेतून संप्रदाय समन्वयाची शिकवण

हरि-हर भेट हा केवळ दोन मंदिरांतील धार्मिक विद्या नसून, विविध उपासना परंपरांमधील समन्वयाचे प्रतीक आहे. शैव आणि वैष्णव परंपरांमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या स्वतंत्र धार्मिक ओळखी असल्या, तरी हरि-हर संकल्पना दोन्ही देवतांतील अभेद अधोरेखित करते. त्यामुळे नाशिकच्या या सोहळ्याला धार्मिक श्रद्धेबरोबरच सांस्कृतिक एकात्मतेचा अर्थही प्राप्त होतो. मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या उत्सवात भाविकांनी दर्शन, पूजन आणि जयघोषातून या परंपरेचा आनंद अनुभवला.

सालाबादाप्रमाणे यंदाही २ २६व्या विष्णू यागात श्रीकपालेश्वर देवस्थानचे मुख्य पुजारी हेमंत गाडे यांनी सपत्नीक पूजन केले. शास्त्री दिनेश गायधने, रवि पैठणे, डॉ. हरिष जोशी, धनंजय जोशी, विक्रम आंबेकर, राहुल बेळे, किरण गायधनी, अमोल थेटे यांच्यासह सर्व आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित होते.

बेलपान-तुळस आदानप्रदानातून ऐक्याचा संदेश

हरि-हर भेटीतील प्रमुख विधी म्हणजे दोन्ही मंदिरांतील पूजा साहित्याचे पारंपरिक आदानप्रदान. श्रीकपालेश्वर मंदिराकडून बेलपान व पादुका सवाद्य मिरवणुकीने श्री सुंदरनारायण मंदिराकडे नेण्यात आल्या, तर सुंदरनारायण मंदिराकडून तुळशीपत्र कपालेश्वर मंदिरात आणण्यात आले. शिवपूजेत बेलपत्र, तर विष्णुपूजेत तुळशीला विशेष महत्त्व आहे. या दोन्ही पूजा परंपरांतील प्रतीकांचा परस्पर स्वीकार हा हरि-हर भेटीचा गाभा मानला जातो. शिव आणि विष्णू वेगवेगळे नसून, एकाच परमतत्त्वाची रूपे आहेत, अशी धार्मिक भावना या विधीतून अधोरेखित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.