

नाशिक : कोरोना काळात उपचारासाठी आलेल्या वैद्यकीय पथकावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीस न्यायालयाने १ वर्ष सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सलीम इब्राहिम तांबोळी (रा. रघुकुल सोसायटी, पंचशिलनगर) असे आरोपीचे नाव आहे.
गोविंदनगर येथील महिला डॉक्टरच्या फिर्यादीनुसार, त्या पथकासह कोरोनाबाधितांच्या नियमित तपासणीसाठी ३ जुलै २०२० रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास तांबोळी यांंच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी डॉक्टरांनी तांबोळी यांना खबरदारी घेण्याबाबत सूचना केल्या असता त्याने आरडाओरड करीत पथकावर हल्ला करीत त्यांना दुखापत केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहायक निरीक्षक एस. एस. वऱ्हाडे यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. लीना चव्हाण यांनी युक्तिवाद केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितिजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. बी. घुले यांनी तांबोळी यास वर्षभर सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस शिपाई आर. जी. तांदळकर, श्रेणी उपनिरीक्षक एस. एस. शिंदे यांनी कामकाज पाहिले.