

नाशिक : घरकुल योजनेच्या प्रथम हफ्त्याचे वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. 22) आयोजीत करण्यात आलेला असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थितीत राहणार आहेत. प्रजासत्ताकदिनाच्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमास मंत्री महाजन हे उपस्थितीत होते. त्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा नाशिकमध्ये होत असलेल्या शासकीय कार्यक्रमास मंत्री महाजन हे उपस्थितीत राहत असल्यामुळे पालकमंत्रीपदी मंत्री महाजन यांचीच वर्णी लागणार या चर्चेने जोर धरला आहे.
ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी, गतीमान, दर्जेदार अंमलबजावणी व लोकसहभागासाठी राज्यात महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शासनाकडून शनिवारी लाभार्थींना मंजूरी पत्र देणे व पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पुणे येथे आयोजित मुख्य कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे उपस्थिती होणार आहे. या कार्यक्रमास नाशिक येथून मंत्री महाजन व शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे मालेगाव येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ३ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले असून नाशिक जिल्ह्यातील १ लाख ४५ हजार ७२७ घरकुल लाभार्थींना मंजूरी पत्र या कार्यक्रमात देण्यात येणार आहे. तसेच ८० हजार घरकुल लाभार्थींच्या खात्यावर घरकुलाच्या पहिला हप्त्याचे वितरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यक्रम हे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होतात. मात्र, पालकमंत्रीपदाचा तिढा सुटले नाही. जिल्ह्यात तीन मंत्री असल्याकारणाने कार्यक्रमास नेमके कोणास बोलवायचे असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडतो. त्यामुळे शासकीय कार्यक्रमास तीनही मंत्र्यांना आमंत्रित केले जात आहे. जिल्हा नियोजन समिती बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून मंत्री भुसे उपस्थिती होते. त्यामुळे पालकमंत्रीपदी भुसे असणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, शासकीय कार्यक्रमांना मंत्री महाजन हे हजेरी लावत आहे. शनिवारी (दि.22) होणाऱ्या या कार्यक्रमास मंत्री महाजन स्वतः उपस्थितीत राहणार असल्याचे सांगितले जात आहे.