Nashik Crime News
Nashik Crime NewsFile Photo

नाशिकमध्ये GST विभागाचा मोठा 'छापा': सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरातून दोन पेट्या भरून कोट्यवधींची रोकड आणि पिस्तूल जप्त

Nashik Crime News : ऑनलाइन गेमिंग ॲपद्वारे करचुकवेगिरीचा संशय; पुण्याच्या गुप्तचर पथकाच्या कारवाईने खळबळ
Published on

नाशिक: ऑनलाइन गेमिंग ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची करचुकवेगिरी करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या मुसक्या आवळण्यात जीएसटी गुप्तचर यंत्रणेला (GST Intelligence) मोठे यश आले आहे. नाशिकच्या देवळाली गाव परिसरातील एका घरातून तब्बल दोन मोठ्या पेट्या (ट्रंका) भरून रोकड, एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पुणे जीएसटी गुप्तचर विभागाच्या या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

आठ तासांच्या चौकशीनंतर पर्दाफाश

जीएसटी गुप्तचर विभागाच्या पुणे युनिटला एका सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून मोठ्या प्रमाणात कर चुकवला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पथकाने नाशिकच्या देवळाली गाव परिसरातील कपालेश्वर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या श्रीकांत परे या सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरावर छापा टाकला. शनिवारी परे याची तब्बल आठ तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीअंती घरात लपवून ठेवलेली संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावून गेले.

छाप्यात काय-काय सापडले ?

या कारवाईत जीएसटी अधिकाऱ्यांनी मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. घरात लपवून ठेवलेल्या दोन मोठ्या ट्रंकांमध्ये (पेट्या) खचाखच भरलेली रोकड सापडली. ही रक्कम सुमारे चार ते पाच कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. केवळ रोकडच नव्हे, तर घरातून एक पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत.

गुन्ह्याची पद्धत आणि दुहेरी कारवाई

संशयित आरोपी श्रीकांत परे हा ऑनलाइन गेमिंग ॲप्लिकेशन्स विकण्याचा व्यवसाय करत होता. या व्यवहारांमध्ये तो बनावट पावत्या तयार करून मोठ्या प्रमाणात जीएसटी चुकवत असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. करचुकवेगिरीच्या या प्रकरणासोबतच, घरात विनापरवाना पिस्तूल आणि काडतुसे सापडल्याने त्याच्यावर दुहेरी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ऑनलाइन गेमिंग आणि ॲप-आधारित व्यवसायांच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक गुन्हेगारीचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास जीएसटी गुप्तचर यंत्रणा आणि नाशिक पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news