नाशिक : मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थे(सारथी)च्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी (दि. २८) दुपारी ३ वाजता होत आहे. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली.
५०० मुलांचे वसतिगृह
५०० मुलींचे वसतिगृह
३०० विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका
५० अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
अत्याधुनिक लिफ्टची व्यवस्था
रेन वॉटर हार्वेस्टिंग
सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून इमारतीवर वॉच
अभ्यासाला पूरक वातावरण
प्रशस्त मिटिंग हॉल
इमारत परिसरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते, आल्हाददायक उद्यान
विद्यार्थी व कर्मचार्यांसाठी सर्व सुविधायुक्त फर्निचर
त्र्यंबक रोड परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमदार प्रा. फरांदे यांच्या प्रयत्नातून तसेच सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या ५०० मुले व ५०० मुलींकरिता वसतिगृह उभारण्याठी १५८ कोटी ९९ लाख ९० हजार ८३० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचा शनिवारी भूमिपूजन सोहळा होत असून, या कार्यक्रमास पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वसतिगृहाच्या निमित्ताने शहरात शिक्षण घेण्याची आणि त्यासाठी रहिवास मिळण्याची मराठा समाजातील विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर होणार आहे. शिवाय, समाजातील अनेक गुणवंतांना प्रोत्साहन मिळून चांगले प्रशासकीय अधिकारी, नोकरदार, व्यावसायिक घडतील, असा विश्वास आ. फरांदे यांनी व्यक्त केला आहे.
या वसतिगृहामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि व्यक्तिगत विकासासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. शुद्ध पाणी, निरंतर इंटरनेट सेवा, ग्रंथालय, सुरक्षितता, स्वच्छता, आहार आणि मनोरजंन व खेळासह समुपदेशनाची सुविधा वसतिगृहाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल.
प्रा. देवयानी फरांदे, आमदार, भाजप