

लासलगाव : राकेश बोरा
निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीचा हंगाम अखेरच्या टप्प्यात असून, रशिया, युक्रेन, फ्रान्स, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, नेदरलॅण्ड, पोलॅण्ड, स्वीडन, स्पेन या देशांमध्ये नाशिकची गोड द्राक्ष निर्यात झाले.
सलग सहाव्या ते सातव्या वर्षी नेदरलॅण्डमध्ये द्राक्षांचे सर्वाधिक कंटेनर नाशिकहून मुंबईमार्गे समुद्री प्रवासाने पोहोचले आहेत. १ नोव्हेंबरपासून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली असून नाशिकमधून ६,३७२ कंटेनरमधून ८६ हजार ३११ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातून १ लाख मेट्रिक टनहून अधिक द्राक्ष निर्यात होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या हंगामात झालेल्या निर्यातीत एकूण निर्यातीपैकी नेदरलॅण्डमध्ये सर्वाधिक ३ हजार ९११ कंटेनरमधून ५२ हजार ४५१ मे. टन द्राक्षे रवाना झाली आहेत. आता द्राक्ष हंगाम अखेरच्या टप्प्यात असून, माल कमी राहिला आहे. द्राक्ष निर्यातीत मागील हंगामाच्या तुलनेत 15 दिवसांपूर्वी घट दिसत होती. मात्र, गेल्या 15 दिवसांत निर्यातीत वाढ झाल्यामुळे मागील वर्षी नाशिकमधून 98 हजार 319 टन द्राक्ष निर्यात झाली होती. यंदा त्यात वाढ होऊ शकते अशी माहिती महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघटनेचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना दिली.
यंदाचा हंगाम दोन आठवडे अगोदर संपेल असा अंदाज वर्तविला जात आहे. वातावरणात होत असलेला सततचा बदल द्राक्षबागांवर परिणाम करणारा ठरला. वातावरणात कधी कधी ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादन घटले आहे. जगभरातून नाशिकच्या द्राक्षांना मागणी असते. त्या तुलनेत मालाचा पुरवठा कमी असल्याने चार महिन्यांच्या पूर्ण हंगामात दरात तेजी दिसून आली. रशिया, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिरातीसाठी मागणी वाढत आहे. यंदाच्या हंगामात द्राक्षमालाचे खुडे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाले होते. त्यास प्रतिकिलो ११० ते १३० रुपयांदरम्यान दर मिळाला होता.
रशिया, युक्रेन, फ्रान्स, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, नेदरलॅण्ड, पोलॅण्ड, स्वीडन, स्पेन या देशांमध्ये नाशिकची द्राक्ष निर्यात झाली. मात्र, यंदादेखील सलग सहाव्या ते सातव्या वर्षी नेदरलॅण्डमध्ये द्राक्षांचे सर्वाधिक कंटेनर नाशिकहून मुंबईमार्गे समुद्री प्रवासाने पोहोचले आहेत.
रशिया- युक्रेन युद्धाची धग अजूनही सुरू असून त्याचा फटका निर्यातदारांना बसला आहे. युद्धामुळे द्राक्षांची निर्यात युक्रेनमार्गे न होता दक्षिण आफ्रिकेमार्गे लांबचा पल्ला गाठून सुरू आहे. त्यामुळे कंटेनरचे भाडेही वाढले आहे.
बांगलादेशाने प्रतिकिलो द्राक्षांसाठी १०० रुपये आयातशुल्क लावल्याने द्राक्ष निर्यातीला अडसर ठरला आहे. याशिवाय समुद्री प्रवास महागला आहे. वातावरणात कधी कधी ढगाळ हवामानामुळे उत्पादन घटते. देशांतर्गत आणि देशाबाहेर चांगली मागणी असल्याने दर टिकून आहे.
कैलास भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघटना, नाशिक.