

नाशिक : विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्यात येणार आहेत. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना शुध्द पाणी, शौचालयाची व्यवस्था व आवश्यक असलेल्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे. कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) च्या युगात जिल्ह्यातील ५०० शाळांमधे वाचनालये उभारण्याचे नियोजन सुरु असल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री भुसे यांनी सांगितले.
जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे गुरुवारी (दि. २०) परशुराम सायखेडकर नाट्यगृहात आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ होते. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, योजना शिक्षणाधिकारी सरोज जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, शिवसेनेचे प्रविण तिदमे, राजू लवटे, विलास शिंदे, भाऊलाल तांबडे आदी उपस्थित होते.
मंत्री भुसे म्हणाले की, समजातील दुर्देवी घटना बघितल्यानंतर मन व्यथित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कार देण्यची आवश्यकता आहे. यादृष्टीने शिक्षण विभाग विचार करत असून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत करण्यासाठी राष्ट्रगीतानंतर प्रत्येक शाळेत महाराष्ट्र गीत गायले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सन २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षातील गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला. स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन त्यांना सन्माणित करण्यात आले. शिक्षण विभागाच्या उपक्रमांविषयी १० मिनिटांची चित्रफित त्यांनी दाखविली. सीईओ ओमकार पवार यांनी माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाविषयी माहिती दिली. दोन दिवसांत साडेतीन कोटींची 'दिवाळी भेट' मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व बाबींमध्ये नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर कसा राहिल, यादृष्टीने शिक्षकांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार्थी शिक्षकांच्या वतीने रमाकांत जगताप, वंदना भामरे व भास्कर साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र उगले यांनी सूत्रसंचालन केले.
खर्च कमी करुन शाळांना मदत करा
सुधारित सुविधा, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या शाळांबद्दलचा समाजातील विश्वास वाढला आहे. परिणामी मोठ्या व्यक्तींची मुलेही आता जिल्हा परिषद शाळांकडे वळताना दिसत आहेत. आजचा शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील पाया घडवणारा मार्गदर्शक आहे. आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. समाजात गुरु-शिष्याचे नाते आजही दृढ आहे. आपला विद्यार्थी घडल्याचे समाधान गुरुजींइतके दुसरे कुणालाही वाटणार नाही. विद्यार्थी रुपी शिष्यांना घडविणारी ही ज्ञानमंदिरे सुधारण्यासाठी वाढदिवस, दशक्रिया विधी यांसारख्या कार्यक्रमांवरील खर्च कमी करुन शाळांना मदत करण्याचे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
या शिक्षकांचा झाला सन्मान
सन २०२४ -२५ वर्षातील पुरस्कारर्थी असे...
रोहिणी गुलाबराव सोनवणे (अजमीर सौंदाणे, ता. बागलाण), जयेश विश्वनाथ सुर्यवंशी (भोयेगाव ता. चांदवड), संज मालोजी गुंजाळ (फांगदर ता. देवळा), दत्तात्रय सुधाकर अलगट (चिकाडी ता. दिंडोरी), प्रतिभा केदा पाटील (भेंडी ता. कळवण), माणिक बाळाजी भालेराव (बोरटेभे ता. इगतपुरी), सविता धर्मा देवरे (टाकळी ता. मालेगाव), प्रदिप अमृत देवरे (बोकडदरे ता. निफाड), योगेश शिवाजी महाजन (सावरगाव ता. नाशिक) , राजु कचरू घोटेकर (वडाळी खुर्द ता. नांदगाव), मंदा वंसत जाधव (कोंटबी (क) ता. पेठ), सोपान खंडू उगले (सुळेवाडी (सुंदरपूर) ता. सिन्नर), संजय आनंदराव गवळी (पळसन ता. सुरगाणा), संतोष लक्ष्मण बेलदार (अंदरसुल ता. येवला), सतिश रंगनाथ पवार (विनायक नगर ता. त्र्यंबकेश्वर)
२०२५-२६ वर्षातील पुरस्कारर्थी
सविता सदासिव आढाव (जांभुळपाडा (शि), त्रंबकेश्वर),किरण रमेश नागरे (वाहेगावसाळ, चांदवड), पांडुरंग गोविंद देवरे (राजोळेवस्ती, निफाड)मारूती सोनू कुंदे (भरवीर बु., इगतपुरी), नरेंद्र तुकाराम सोनवणे (जऊळके, दिंडोरी), उमाकांत कृष्णा घुटे (नाचलोंढी, पेठ), वंदना रामदास भामरे (देवळा मुली, ता. देवळा), रामदास हिरारी भोये (तोरणडोंगरे, सुरगाणा), संदीप सखाराम गिते (मोह, सिन्नर), शैलेश विश्वनाथ टिळेकर (जळगाव बु, नांदगाव), रमाकांत कृष्णराव जगताप (राजुरबहुला, नासिक), बाबासाहेब नागनाथ बेरगळ (अंदरसुल मुली, येवला), भगवान काशिनाथ सोनवणे (पिंजारवाडी, मालेगाव)