

नाशिक: जिल्हयातील सर्वच शासकीय कार्यालयात 31 मार्चच्या पार्श्वभूमीवर निधी खर्चाची लगबग सुरू आहे. यातच निधी वेळात खर्च व्हावा यासाठी 29 ते 31 मार्च या शासकीय सुट्टीच्या दिवशाही शासकीय कार्यालये सुरू ठेवण्य़ाचे आदेश आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका आदींचे कामकाज हगे नियमित सुरू राहणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रविवारी (दि.30) गुढीपाडव्याची दिवशीही कामावर यावे लागणार आहे.
29 मार्च रोजी शेवटचा शनिवारी, 30 मार्च रविवारी तसेच गुडीपाडवा आहे तर, 31 मार्चला आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने शासकीय सुट्टी आहे. मात्र, सन 2024-25 या आर्थिक वर्ष संपण्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या कालावधीत विविध विभागांमध्ये शासकीय अनुदान प्राप्त होणे, देयके स्वीकारणे, खर्च करणे आदी कामकाज ऑनलाईन पध्दतीने सुरू आहे. यात काही विभागांचा अखर्चित असणारा निधी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जिल्हा परिषेदला प्राप्त होतो. यामुळे 29 ते 31 मार्च या कालावधीत शासनाने कार्यालये सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हा परिषदेत गत महिनाभरापासून शासकीय सुट्टीच्या दिवशी सर्व कार्यालये सुरू ठेवत काम सुरू आहे. शासकीय सुट्टी असलेल्या दिवशीही जिल्हा परिषदेचे नियमित कामकाज सुरू होते. आता या आदेशाने पुढील तीन दिवसही जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू असणार आहे. यात रविवारी गुढीपाडवा आहे. मात्र, या दिवशाही कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी कार्यालयात यावे लागणार आहे.
वार्षिक बाजारमूल्य दर तक्ते दरवर्षी १ एप्रिल रोजी प्रसिद्धी होत असल्याने तसेच महत्त्वाच्या सणांमुळे दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुद्रांक जिल्हाधिकारी व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये दि. 29 ते 31 मार्च या शासकीय सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत, असे नाशिकचे सहजिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी पत्रकान्वये कळविले आहे. शासकीय सुटीच्या दिवशी दस्त नोंदणीचे काम करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.