

नाशिक : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच 'इस्रो'ची भेट ही मविप्र संस्थेने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली सुवर्णसंधी आहे. ही केवळ एक सहल नाही तर ती शिकण्याची, प्रेरणा घेण्याची सुवर्णसंधी आहे. या भेटीतील प्रत्येक क्षण महत्वाचा असेल. विद्यार्थ्यांनी 'इस्रो'च्या कामातून प्रेरणा घेऊन विज्ञान क्षेत्रात यशस्वी संशोधन करावे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न करा, मनातील शंका, प्रश्न सोडवा आणि मिळालेल्या संधीचे सोने करा, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेच्या मराठा हायस्कूलमधील तब्बल ४० विद्यार्थी आणि ६ शिक्षक इस्रो या संस्थेला भेट देण्यासाठी मंगळवारी (दि.११) बंगळूरूला रवाना होणार आहेत, तत्पूर्वी शनिवारी (दि.८) गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित या विद्यार्थ्यांच्या 'शुभेच्छा समारंभा'प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी मविप्र संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षस्थानी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर होते. प्रारंभी मविप्रचा दिवंगत खेळाडू अर्जुन सोनवणे यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व्यासपीठावर मविप्रचे उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, शिवसेनेचे अजय बोरस्ते, राजू लवटे, मविप्र संचालक प्रवीण जाधव, ॲड.लक्ष्मण लांडगे, ॲड. रमेशचंद्र बच्छाव, नंदकुमार बनकर, शोभा बोरस्ते, सी. डी. शिंदे, तसेच शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. विलास देशमुख, दौलत जाधव, डॉ. कैलास शिंदे, अजित मोरे, मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके यांनी प्रास्ताविक केले. सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते ना. भुसे यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थिनी समृद्धी बच्छाव हिने प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत मांडले. यावेळी उपमुख्याध्यापक संजय ठाकरे, पर्यवेक्षक देविदास भारती, विजय पवार व प्रताप काळे आदींसह सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एस. आर. जाधव, एस. एस. कदम यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक देविदास भारती यांनी आभार मानले.
यांचाही झाला सन्मान
श्रीलंका इंटरनॅशनल मास्टर्स ओपन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ४००मी. सुवर्ण, ८०० मी. रौप्य, २०० मी. कांस्य व १००×४ रिले कांस्य पदक मिळविणाऱ्या उपशिक्षिका मंगला बागूल, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून साउथ एशियामध्ये १० किलो मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक मिळविणारी धावपटू रविना गायकवाड तसेच, तन्मय खुर्दळ, वैष्णवी शिंदे, विज्ञान शिक्षक पांडुरंग कर्पे, एस. एस. कदम, चौधरी यांचा यावेळी मंत्री भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.