नाशिक : शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे गोदावरी नदीला या हंगामातील पहिला पूर गुरुवारी (दि. १९) रोजी आला तर संततधार कायम असल्याने गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी सोमवारी (दि.23) दुपारी 2 वाजता गंगापूर धरणातून 6 हजार 160 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडण्यात आल्याने नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याने नागरिकांनी सुरक्षेसंबंधी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातल्याने धरणांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. परिणामी जिल्ह्यांतील सर्वच धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शुक्रवारपासून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सोमवारी दुपारी 2 वाजेपासून 6 हजार 160 क्सुसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गोदावरीला पुर येण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात शुक्रवारपासून (दि.20) धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. शुक्रवारी (दि.20) 1160 क्सुसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. तर शनिवारी (दि.21) वेग वाढवून 2 हजार 320 करण्यात आला. त्र्यंबक आणि नाशिकमध्ये पावसाची संततधार कायम असल्याने पुन्हा एकदा रविवारी (दि.22) रोजी विसर्ग 2 हजार 320 वरुन 3 हजार 944 करण्यात आला. अद्यापही धरणात पाणीसाठा वाढत असल्याने सोमवारी (दि.23) रोजी पुन्हा एकदा विसर्ग वाढविण्यात आला. सध्या 6 हजार 160 क्सुसेक वेगाने गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गाेदावरी नदीला या हंगामातील दुसरा पूर आला आहे. धरण्यातल्या पाणी पातळीनुसार विगर्स टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार असल्याने नदीप्रवाहात कोणीही जाऊ नये तसेच नदीकाठा लगतचे रहिवांशाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पशुपालकांनी पशुधन, चीजवस्तू, शेतीमोटार पंप सुरक्षित स्थळी हलवावे असे आवाहन नाशिक पाटंबधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.