नाशिक : केंद्र शासनाच्या निर्देशांनंतर 'नमामि गोदा' प्रकल्पात (Namami Goda Project) समाविष्ट करण्यात आलेली ५३० कोटींची नदी संवर्धन योजना (Godaswardhana project) अर्थात मलनिस्सारण योजनेचा प्रस्ताव पुनरूज्जीवित करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू झाल्या असून राज्याच्या नगरविकास विभागाने यासंदर्भात शुक्रवारी (दि.१९) महत्वाची बैठक बोलविली आहे.
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक महापालिकेने अनेक कामांचे प्रस्ताव तयार केले आहेत. त्यात सिंहस्थापूर्वी गोदावरीसह उपनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यासाठी 'नमामि गोदा' प्रकल्पाला चालना देण्यात आली आहे.
गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत (Godaswardhana project) शासनाच्या मान्यतेसाठी ५३० कोटींचा मलनिस्सारण योजनेचा प्रस्ताव सादर केला होता. नमामि गोदा प्रकल्प (Namami Goda Project) आणि मलनिस्सारण प्रकल्पातील काही कामांमध्ये साम्य असल्याने केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाने दोन्ही प्रकल्प एकत्र करण्याचे निर्देश देत सुधारीत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते.
त्यानुसार महापालिकेकडून सुधारीत आराखडा तयार करण्याचे काम सुरू असताना मलनिस्सारण योजनेचा प्रस्ताव पुनरूज्जीवित करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू झाल्या आहेत. महापालिकेला १९ नैसर्गिक नाल्यांतील पाण्याच्या शुद्धीकरणाची आवश्यकता आहे. भुयारी गटार योजनेऐवजी महापालिकेच्या पावसाळी नाल्याला अनेकांनी सांडपाण्याचे कनेक्शन जोडले असून त्यामुळे नदीपात्रात पाणी जात आहे. हे पाणी भुयारी गटार योजनेअंतर्गत एकत्र होऊन महापालिकेच्या मला जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये जाणे अपेक्षित आहे. त्या ठिकाणी प्रक्रिया करून मग ते पाणी नदीपात्रात सोडले पाहिजे. यासाठी या योजनेअंतर्गत मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ व मलवाहिकांचे जाळे निर्मितीचा प्रस्ताव आहे. वाढत्या शहरीकरणाच्यापार्श्वभुमीवर चार नवीन मलजल शुद्धीकरण केंद्रही प्रस्तावित केले आहे. (Godaswardhana project)
शहरामध्ये रोज किती एमएलडी सांडपाणी संकलित होते.
सध्या सुरू असलेल्या एसटीपीची एमएलडीनुसार कॅपॅसिटी
सध्याच्या एसटीपीची एमएलडी नुसार शुद्धीकरणाची कॅपॅसिटी
नवीन मलजल शुद्धीकरण केंद्रांची तसेच पूर्ण होण्याचा कालावधी
प्रक्रिया केलेल्या पाण्यातील बीओडी, सीओडी, टी एस एस व अन्य घटक
सध्याचे एसटीपी वापरण्यामागे कारण काय?
नवीन मलजल शुद्धीकरण केंद्रासाठी किती निधी लागणार आहे.
प्रक्रिया करून नदीमध्ये पाणी सोडल्यानंतर किती महसूल मिळणार.
नमामि गोदा प्रकल्पाबरोबरच सांडपाणी व्यवस्थापनासाठी ५३० कोटींचा मलनिस्सारण आराखडा तयार केला आहे. राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेतून या प्रस्तावासाठी निधी मिळणे अपेक्षित आहे. यासंदर्भातील माहिती शासनाने मागविली असून तातडीने राज्य शासनाला अहवाल सादर केला जाईल.
संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता, मनपा, नाशिक.