पंचवटी : अयोध्येतील राममंदिरात श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेने (शिंदे गट) तर्फे बुधवारी (दि. २२) श्रीराम उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात महाआरती व रामकुंडावर गोदापूजन, आरती करण्यात आली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिंदेसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
यावेळी उपनेते विजय करंजकर, महानगरप्रमुख प्रविण तिदमे, आ. किशोर दराडे, राजू लवटे, संपर्कप्रमुख सुनील पाटील, भागवत आरोटे, भाऊलाल तांबडे, श्यामला दीक्षित यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. काळाराम मंदिरात चौधरी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, शेखर पुजारी उपस्थित होते. त्यानंतर रामकुंड येथे येऊन गोदा पूजन होऊन महाआरती झाली. त्यासाठी रामकुंडावर आरतीसाठी मंच उभारला होता. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी रामजन्मभूमीच्या आंदोलनप्रसंगी केलेल्या घोषणा देत, आठवणींना उजाळा दिला. ब्रम्हवृंदानी मंत्रघोष केला. सदानंद देव यांनी शंखनाद व डमरू नाद केला. त्यानंतर 'गोविंद बोलो हरी गोपाल बोलो' हे भजन झाले. आरती गोदामातेची पावन गुप्त गौतमीची ही आरती करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माध्यमातून यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
महापालिका निवडणूक तोंडावर असताना शिवसेनेच्या शिंदे गटाला गटबाजीचे ग्रहण लागल्याचे या 'श्रीराम उत्सव' कार्यक्रमातून दिसून आले. अयोध्येतील राममंदिरातील श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या जाहिरातीतून उपनेते अजय बोरस्ते यांचे नाव वगळले होते. त्यामुळे ते कार्यक्रमास अनुपस्थित राहिले. त्यातच पालकमंत्री दादा भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे, हेही या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. भाऊलाल तांबडे वगळता अन्य जिल्हाप्रमुख तसेच उपजिल्हाप्रमुख, महिला जिल्हाप्रमुख, तसेच डझनभर माजी नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.