

देवळा ; येथील आंबेडकरनगर मध्ये गॅस सिलेंडरला गळती लागल्यामुळे दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी गॅस एजन्सीचा कर्मचारी तात्काळ पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की , सोमवारी दि. २२ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास देवळा येथील सटाणा रस्त्यावरील आंबेडकर नगर मधील रहिवासी पोपट गांगुर्डे यांच्या घरात गॅस सिलेंडरला गळती लागली. यामुळे रेग्युलेटर जवळ गॅसचा भडका उडाला. ही आग विझविण्यासाठी गेलेले गांगुर्डे किरकोळ जखमी झाले तर स्वयंपाक घरातील साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. याची माहिती खाली राहत असलेले त्यांचे भाडेकरू साहेबराव पवार (पेंटर ) यांना मिळताच त्यांनी या घटनेची माहिती येथील अर्जुन सागर गॅस एजन्सीचे कर्मचारी भाऊसाहेब अहिरे यांना कळवली. अहिरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सिलेंडर ची गळती थांबवली व पुढील अनर्थ टळला.
यात पोपटराव गांगुर्डे, भाडेकरू साहेबराव पवार तसेच कर्मचारी भाऊसाहेब अहिरे हे किरकोळ जखमी झाले. तसेच स्वयंपाक घरातील साहित्य जळून खाक झाले. रेग्युलेटर व्यवस्थित लावले नसल्याने ही घटना घडल्याची माहिती कर्मचारी अहिरे यांनी यावेळी दिली. या घटनेचा गॅस एजन्सीने रीतसर पंचनामा केला असून, गांगुर्डे यांना कंपनीकडून नुकसान भरपाई मिळेल अशी माहिती गॅस एजन्सीचे संचालक आनंद गोळे यांनी दिली.