सुखकर्ता, दुखहर्ता, विघ्नहर्ता, बुद्धिदाता अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या श्री गणेशाचे आगमन बांधकाम, वाहन, सराफ, होम अप्लायन्सेस अशा सर्वच क्षेत्रात भराभराट निर्माण करणारे ठरत आहे. विशेषत: बांधकाम आणि वाहन उद्योगांवर 'श्री'ची मोठी कृपादृष्टी बघावयास मिळत असून, या क्षेत्रातील रोजची उलाढाल विक्रेत्यांना सुखावणारी ठरत आहे. (The daily turnover during Ganeshotsav is proving to be pleasing to the sellers)
कोरोनाचे संकट टळले असले तरी, बांधकाम आणि वाहन उद्योगात त्याचे सुप्त परिणाम अजूनही दिसून येत आहेत. ही दोन्ही क्षेत्र त्यातून सावरत असून, 'श्रीं'च्या आगमनाने या क्षेत्राला उभारी घेण्याची ताकद मिळाली आहे. गणेशोत्सव काळात बांधकाम आणि ऑटोमोबाइल क्षेत्रात दररोज मोठी उलाढाल होत आहे. व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिलेल्या ऑफर्स सप्टेंबर अखेरपर्यंत कायम ठेवल्या जाणार असल्याने, या दोन्ही क्षेत्रात मोठ्या उलाढालीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहराच्या चहुबाजीने सध्या बांधकामे सुरू आहेत. काही ठिकाणी रेडीपझेशन घरे उपलब्ध असल्याने अनेकांनी गणेशोत्सवातच गृहप्रवेश करण्याचे नियोजन केले आहे. तर चारचाकी खरेदीकडेही मोठा कल वाढल्याने वाहन बाजारात सध्या गर्दी बघावयास मिळत आहे.
वाहन बाजारात चारचाकी खरेदीवर २५ ते ६० हजारांपर्यंतचा डिस्काऊंट उपलब्ध करून देण्यात आला आहे. एक्सचेंजला २० हजारांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. दुचाकीवर देखील डिस्काऊंट ऑफर असल्याने, खरेदीकडे कल वाढत आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर दररोज सरासरी २० ते २५ चारचाकींचे बुकींग केले जात आहे. दुचाकीची संख्या ४० ते ५० इतकी असल्याचे विक्रेते सांगतात. बांधकाम क्षेत्रात फ्लॅट, रो-हाऊस खरेदीवर शून्य टक्के स्टॅम्पड्यूटी अशाप्रकारची ऑफर दिली जात आहे. याशिवाय इंटेरियर मोफत दिले जात आहेत. तसेच ५० पेक्षा अधिक अॅमेनिटीज दिल्या जात आहेत.
गणेशोत्सवात वाहन बाजारात समाधानकारक स्थिती आहे. चारचाकी वाहनांची दररोज सरासरी २० ते २५ इतकी बुकींग होत आहे. हा उत्साह इथून दिवाळीपर्यंत कायम राहणार आहे. पितृपक्षात बुकींग करून त्याची डिलिव्हरी नवरात्रात घेण्याचे अनेकांचे नियोजन आहे.
राजेश कमोद, महाव्यवस्थापक, सेवा ऑटो, नाशिक.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत सुमारे अडीचशेपेक्षा अधिक घरांची विक्री अपेक्षित आहे. रेडिपझेशन घरांना चांगली मागणी आहे. याशिवाय बँकांककडून कर्ज प्रकरणाला चांगला प्रतिसाद दिला जात असल्याने, रिअल इस्टेट क्षेत्रात तेजीचे वातावरण आहे. ही तेजी फेब्रुवारी २०२४ पर्यंत कायम राहिल, असा अंदाज आहे.
कृणाल पाटील, अध्यक्ष, क्रेडाई. नाशिक.