Nashik | जल्लोषात १२ तास चालली मिरवणूक

Nashik Ganesha Visarjan Miravnuk 2024 | रात्री 12 वाजता ढोल ताशा व डीजेचा दणदणाट थांबला
Nashik Ganesha Visarjan Miravnuk
ढोल-ताशे, डीजेच्या दणदणाटात वाजत-गाजत नाशिककरांनी गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.छाया- हेमंत घोरपडे
Published on
Updated on

नाशिक : ढोल-ताशे, डीजेच्या दणदणाटात वाजत-गाजत नाशिककरांनी गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. यावेळी गणेश भक्तांनी थिरकत, जयघोष करीत मुख्य विसर्जन मिरवणुकीत रंगत आणली होती. वाकडी बारव येथून सुरू झालेली मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक बारा तास जल्लोषात सुरू होती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचा जल्लोष, शिस्तबद्धता आणि समन्वय असल्याने कुठलीही अनुचित घटना घडली नाही. पोलिसांनी बंदोबस्ताचे सुक्ष्म नियोजन केल्याने निर्विघ्न मिरवणूक पार पडली.

भद्रकाली येथील वाकडी बारव येथून मंगळवारी (दि. १७) दुपारी बारा वाजता पालकमंत्री दादा भुसे, खा. राजाभाऊ वाजे, आ. प्रा. देवयानी फरांदे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, माजी महापौर विनायक पांडे यांसह सर्व मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नाशिक महापालिकेच्या गणपतीची आरती करून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. सुरुवातीच्या सात ते आठ मंडळांच्या पारंपारिक ढोल ताशा तसेच लेजिम पथकानी भाविकांचे लक्ष वेधले. तर इतर मंडळांनी डीजे व विद्युत रोषणाई लाऊन भक्तांना थिरकण्यास प्रवृत्त केले.

दरम्यान, एकाच ठिकाणी २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ ढोल ताशा पथक व डिजेवाले थांबल्याने मिरवणूक रेंगाळली होती. दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या मिरवणुकीत सायंकाळी पाचपर्यंत नागरिकांचा सहभाग तुरळक होता. मानाचे पाच गणपतींचे मंडळ पुढे सरकले होते, तर इतर मंडळांनी तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर गर्दी वाढण्यास सुरुवात झाल्याने मिरवणुकीत रंगत वाढली. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' आदी घोषणांचा जयघोष करीत ढोल-ताशा पथके, लेजिम पथके आणि पारंपरिक वेशातील तरुणाईने मिरवणुकीत रंगत आणली. मिरवणूक पाहणाऱ्यांची व नाचणाऱ्यांची गर्दी वाढल्याने मिरवणुूकीतील मंडळांमधील अंतर वाढले. त्यामुळे मिरवणुकीचा वेग मंदावला होता. पोलिसांनी संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सुचना करीत अंतर कमी करण्यास सुरुवात केली. रात्री ठीक बारा वाजता मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

पालकमंत्र्यांकडून ताशा वादन

पालकमंत्री भुसे यांनी मिरवणुकीच्या सुरुवातीस सहभागी होत ढोल व ताशांचे वादन केले. यावेळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ढोलताशांच्या तालावर ठेका धरला.
पालकमंत्री भुसे यांनी मिरवणुकीच्या सुरुवातीस सहभागी होत ढोल व ताशांचे वादन केले. यावेळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ढोलताशांच्या तालावर ठेका धरला.

दाक्षिणत्य 'बीट्स', भस्म नृत्याने रंगत

मिरवणुकीत प्रत्येक मंडळाने वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार एका मंडळाने नंदीस्वार शंकर, हनुमानासह इतर देवीदेवतांच्या अवतार आकर्षक वेशभूषेसह सादर केले. त्यात भस्म नृत्य, तिसऱ्या डोळ्यातून व नंदीच्या शिंगातून होणारी अग्निमारा यामुळे भाविकांच्या डोळ्यांची पारणे फेडली. तर एका मंडळाने दाक्षिणात्य पद्धतीने ढोल वादन करून व भरतनाट्यम नृत्य सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळवली.

पोलिस सतर्क

मिरवणुकीत सायंकाळनंतर नाशिककरांची गर्दी वाढली. ढोलपथकांच्या पदाधिकाऱ्यांनी धरलेल्या दोरखंडामुळे इतर नागरिकांना त्रास होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी या पदाधिकाऱ्यांनी दोरखंड कमी करण्यास सांगितला. तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी वेळीच दणका दिल्याने पुढील अनर्थ टळला.

वेळेचे नियोजन विस्कळले

रात्री १२ पर्यंत मिरवणुकीतील मंडळे अशोक स्तंभापर्यंत येत नसल्याच्या तक्रारींमुळे पोलिसांनी प्रत्येक मंडळास एका चौकात २० मिनिटांचा कालावधी दिला होता. मात्र मिरवणूक सुरू होण्यास एक तासाचा विलंब झाला. तसेच मंडळांनी २० मिनिटांच्या वेळेचे नियोजन न पाळल्याने रात्री बारा वाजता अनेक मंडळांच्या मिरवणुका बादशाही कॉर्नरच्या पुढे पोहोचल्या नव्हत्या. रात्री बारा वाजता बाराव्या क्रमांकाचे मंडळ मेहेर सिग्नलवर असताना मिरवणूक थांबली होती.

मिरवणुकीत सहभागी मंडळे

नाशिक महापालिका, रविवार कारंजा मित्रमंडळ (चांदीचा गणपती), गुलालवाडी व्यायामशाळा, भद्रकाली कारंजा मित्रमंडळ (साक्षी गणेश), श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ पेठ रोड, सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्रमंडळ (नाशिकचा राजा), सरदार चौक मित्रमंडळ, शिवसेवा मित्रमंडळ, शिवमुद्रा मित्रमंडळ (मानाचा राजा), युवक मित्रमंडळ, दंडे हनुमान मित्रमंडळ, युनायटेड फ्रेंड सर्कल, शनैश्वर युवक समिती चौक मंडई, नेहरू चौक मित्रमंडळ पिंपळपार, वेलकम सहकार्य मित्रमंडळ, गणेश मूकबधिर मित्रमंडळ, गजानन मित्रमंडळ, महालक्ष्मी चाळ सोशल फाऊंडेशन, बुरूड गल्ली लोकप्रिय मित्र मंडळ, भोई मित्र मंडळ या क्रमाने मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.

वेळेत मिरवणूक संपली

सायंकाळी मिरवणुकीत गर्दी वाढल्याने मंडळे रेंगाळण्यास सुरुवात झाली. मंडळांनी दोनपेक्षा जास्त ढोल पथके मिरवणुकीत सहभागी केले. मिरवणूक लांबत असल्याने पोलिसांनीही ध्वनिक्षेपकावरून सूचना सुरू केल्या. रात्री बारा वाजता दंडे हनुमान मित्र मंडळाची मिरवणूक मेहेर सिग्नलवर असताना पोलिसांनी मिरवणूक संपवण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार ठिक बारा वाजता मंडळांकडील ढोल ताशा व डीजेचा दणदणाट थांबला. तर ज्यांच्याकडील डीजे सुरू होता, त्यांच्याकडे गुन्हे शाखेसह स्थानिक पथके फौजफाट्यासह गेली व त्यांनी डीजे बंद केला.

बॅरकेडींगजवळच वाहन तळे

मिरवणूक मार्गात जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांनी बल्ली बॅरकेडींग केली होती. मिरवणुकींमध्ये सहभागी होणाऱ्यांची गर्दी वाढल्याने नागरिकांनी बॅरकेडींगपर्यंत वाहने जमा होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांनी तेथेच वाहने पार्क करून मिरवणुकीत सहभागी झाले. त्यामुळे मिरवणूक मार्गांजवळील मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती.

संस्मरणीय मिरवणूक

सकाळी साडेदहा वाजता पोलिस बंदोबस्तात मिरवणूक मार्गाची पाहणी केली. तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकातर्फे मंडळांच्या चित्ररथांची तपासणी करण्यात आली. मिरवणुकीवर ड्रोनसह २०० सीसीटीव्हींची नजर होती. मिरवणुकीत २० मंडळांनी सहभाग नोंदवला होता. सायंकाळी पाच वाजता पहिल्या मंडळाचे गणेश विसर्जन झाले. व्हिडिओ, फोटो, रील्स करण्यात ढोलपथकांसह भक्तांची चढाओढ पहावयास मिळाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news