नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीसंदर्भात भद्रकाली पोलिस ठाण्यात शहर पोलिसांनी ढोल ताशा पथकांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मिरवणुकीत प्रत्येक पथकात ५० पेक्षा जास्त वाद्य वाजवू नये अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. तसेच इतरही अनेक सूचना देत मिरवणुकीत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी चर्चा केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनीही त्यांना भेडसावणारी प्रश्न पोलिसांसमोर मांडला.
भद्रकाली पोलिस ठाण्यात रविवारी (दि. ८) उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी ढोल-ताशा पथकांमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, सुरेश आव्हाड यांच्यासह ढोल-ताशा पथकाचे पदाधिकारी प्रीतम भामरे, कुणाल भोसले, सर्जेराव वाघ, रवींद्र राऊत, नारायण जाधव, विरेन कुलकर्णी, विपुल ढवण, अमी छेडा, अरुण मुंगसे, कुणाल आहिरे, अख्तर शेख यांच्यासह एकूण १६ पदाधिकारी उपस्थित होते. पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन सगळे पथक करतील व प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले.
मिरवणुकीदरम्यान अतिरिक्त वादक असतील. मिरवणुकीत एका पथकाकडून ५० पेक्षा जास्त वाद्य वाजविले जाणार नाहीत. कोणतेही ढोलपथक, बॅन्जोपथक हे एका ठिकाणी २० मिनिटांपेक्षा जास्त थांबणार नाही. वाद्यपथकांनी दोरखंडाचा वापर करताना दोन्ही बाजूंनी भाविकांसाठी जागा सोडावी. वादकांच्या तीनच्या वर रांगा नसतील तसेच अरुंद रस्त्यांवर २ रांगा होतील. मिरवणुकीत मंडळांनी गुलालाची उधळण करू नये, जेणेकरून लहान मुले, महिलांना त्रास होणार नाही. मिरवणूक मार्गावरील स्वागत कक्षासमोर वाद्यपथक थांबणार नाहीत. एका मंडळासोबत एका प्रकारचे वाद्यपथक असतील.