चांदवड : शहरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. हे कुत्रे नागरिकांवर हल्ले करत असल्याने या कुत्र्यांच्या धाकामुळे नागरिकांना जीवमुठीत घेऊनच चालावे लागत आहे. त्यामुळे नगरपरिषदने मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (There has been a huge increase in the number of stray dogs in the city. These dogs are attacking citizens)
‘चांदवड’ हे डोंगर परिसरात वसलेले शहर आहे. या शहराच्या सभोवताली असलेल्या डोंगर भागात शहरी भागातून पकडून आणलेले मोकाट कुत्रे रात्रीबेरात्री सोडून दिले जातात. हे मोकाट कुत्रे अन्न पाण्याच्या शोधार्थ शहरात येतात. सध्या शहरात कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहरातील कोणत्याही भागात गेले तरी सगळीकडे मोकाट कुत्रेच कुत्रे बघावयास मिळतात. सध्या, गणपती उत्सव सुरू आहे. त्यामुळे रात्री देखावे पाहण्यासाठी नागरिक घराबाहेर पडतात. मात्र, अंधारातून नागरिक जात असताना हे कुत्रे त्यांच्या अंगावर धावून जातात त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. शांतता समितीच्या बैठकीतही नागरिकांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. मात्र, अद्यापही नगरपरिषदेकडून त्यावर कार्यवाही झालेली नाही. शाळकरी मुले- मुली, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, पुरुष रस्त्याने पायी चालताना जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहे. मोकाट कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला केल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहे.
शहरात मोकाट कुत्र्यांची प्रचंड वाढ झाली आहे. कुत्रे चावतील या भीतीमुळे नागरिकांत दहशत पसरली आहे. नगरपरिषदेने त्वरित मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा नगरपरिषदेवर सर्व चांदवडकरांच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल.
सचिन खैरनार, उबाठा गट, उपशहरप्रमुख, नाशिक.
चांदवड नगर परिषदेच्या हद्दीत डोंगराळ भागात रात्रीच्या वेळी बाहेरून कुत्रे सोडली जातात. यामुळे शहरात कुत्र्यांचा वावर वाढला आहे. या कुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपरिषदेकडून त्वरित कारवाई करण्यात येईल.
विजय सोनवणे, स्वच्छता निरीक्षक, नाशिक.