

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : नाशिकरोड येथील समता नागरी पतसंस्थेने सहा कोटी रुपयांचे थकीत कर्ज दाखवत तब्बल 40 कोटी रुपये किमतीची मालमत्ता केवळ पाच कोटी रुपयांना विक्री केल्याची बाब उघडकीस आली. या संशयास्पद विक्री व्यवहाराविरोधात संबंधित मालमत्ताधारकाने पिंपळगाव पोलिसांत तक्रार दिल्याने पतसंस्थेच्या चेअरमनसह खरेदीदारावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी उपनिबंधकांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसवंत येथील वसंत मधुकर घोडके या व्यावसायिकाने काही वर्षांपूर्वी समता नागरी पतसंस्थेत व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. कर्जाच्या हमीवर त्याने स्वतःची व्यावसायिक मालमत्ता गहाण ठेवली होती. आर्थिक अडचणींमुळे कर्जफेड काही काळ रखडली असली, तरी मूळ थकबाकीची रक्कम संस्थेने दाखविल्याप्रमाणे सहा कोटी रुपये नव्हती, असा दावा तक्रारदाराने केला आहे.
तथापि, पतसंस्थेने कर्जवसुलीच्या नावाखाली अधिकृत नोटीस न देता, कोणताही सार्वजनिक लिलाव न काढता, काही निवडक लोकांच्या संगनमताने ती मालमत्ता केवळ पाच कोटी रुपयांना विकून टाकल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यामध्ये याप्रकरणी नाशिकरोड शाखेसह संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश कुयटे, विक्री व वसुली अधिकारी जनार्धन कदम, मुख्याधिकारी सचिन भट्टड, नाशिकरोड शाखेचे शाखाधिकारी आनंद निकुंभ, किशोर मनचंदा व दीपक मनचंदा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयास्पद व्यवहाराचा दावा
ज्या मालमत्तेचा बाजारभाव किमान ४० कोटी रुपये आहे, ती मालमत्ता अवघ्या पाच कोटींना विक्री करण्यात आली. बाजारमूल्याच्या जवळपास ८०-९० टक्के कमी किमतीला झालेला हा व्यवहार संशयास्पद असल्याचा दावा केला जात आहे. तक्रारदाराने म्हटले आहे की, मालमत्तेची किंमत जाणूनबुजून कमी दाखवली, योग्य मूल्यांकन न करता विक्री प्रक्रिया राबवली. संस्थेच्या अंतर्गत समित्यांची परवानगी न घेता निर्णय घेतला. विक्रीसाठी कोणतीही बोली प्रक्रिया न काढता थेट मालमत्ता हस्तांतरित करण्यात आली. हे सर्व कृत्य फसवणूक, विश्वासघात आणि आर्थिक घोटाळ्याच्या श्रेणीत मोडते, असे तक्रारदार घोडके यांनी फिर्यादीत म्हटले आहे.