नाशिक : पोलिस असल्याची बतावणी करून भामट्यांनी वृद्धेकडील सोन्याचे दागिने घेत पसार झाल्याची घटना राजीवनगर परिसरात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेगेकिली शकतिवेल नाडार (६६, रा. चेतनानगर) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (दि. १८) सकाळी दहा वाजता राजीवनगर येथे भामट्यांनी फसवले. तेगेकिली या परिसरातून पायी जात असताना दुचाकीस्वार भामटे त्यांच्याजवळ आले. आम्ही पोलिस आहोत असे सांगून तुमच्या गळ्यातील दागिने काढून द्या आम्हाला तपासायचे आहे असे सांगितले. त्यानुसार तेगेकिली यांनी दागिने काढून संशयितास दिले. त्याने तपासणी करण्याच्या बहाण्याने दागिने तेगेकिली यांच्या पिशवीत ठेवत असल्याचे भासवले. मात्र हातचलाखीने त्याने १ लाख १२ हजार रुपयांचे ४२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तेगेकिली यांनी इंदिरानगर पोलिसांकडे फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे.