

नाशिक : उद्योजकाची १० लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पिता-पुत्रावर मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब पुंजाजी सांगळे यांच्या तक्रारीवरून कार्तिक संजीव आव्हाड व संजीव शंकर आव्हाड अशी फसवणूक करणाऱ्या संशयितांची नावे आहेत.
संशयित आरोपी आव्हाड यांनी संगनमत करत आव्हाड इन्फ्रा अँड मायनिंग या नावाने कंपनी असल्याचे सांगितले. फिर्यादीच्या श्रीवर्धन येथे सुरू असलेल्या कामांत डबल पुरवठा करतो असे आश्वासन दिले. त्या मोबदल्यात २० लाख रुपये घेतले. मात्र, फिर्यादीने वारंवार पाठपुरावा करूनही डबल पाठवले नाही. पैशाचा तगादा लावला असता १० लाख रुपये कंपनीच्या खात्यावर पाठवून दिले. मात्र, उर्वरित १० लाख रुपये देण्यासाठी वारंवार टाळाटाळ केली. फिर्यादी सांगळे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने मुंबई नाका पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. संशयित आरोपींना विरोधात तक्रार दिली आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक राम गोडे करत आहे.
पिता-पुत्रांविरुद्ध यापूर्वीही गुन्हा
सरकारवाडा पोलिस ठाण्यात अडीच कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी या दोघांवर अलीकडेच गुन्हा दाखल करण्यात आला. स्टोन क्रेशरमध्ये भागीदारीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर तक्रारीत केला आहे.