

नाशिक : साठेखत रद्द न करता वीस गुंठे मिळकत परस्पर त्रयस्थ व्यक्तीला खरेेदी देऊन एका बांधकाम व्यावसायिकांची तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी १६ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत फिर्यादी दर्शन रमणलाल बंब (रा. सुयोजित गार्डन, गंगापूूर रोड) हे असून ते जमीन खरेदी-विक्री तसेच बांधकामाचा व्यवसाय करतात. त्यांनी गोवर्धन येथे गट नं. १०६ क्षेत्र ३.५२ आर ही मिळकत खरेदीसाठी मरियम बशीर अत्तार व शेरबानो सलीम अत्तार या दोन्ही बहिणी व त्यांच्या वारसांबरोबर व्यवहार पक्का केला. या व्यवहारात जबीखान सत्तारखान तडवी हे या दाेन्ही महिला व फिर्यादी यांचे परिचित आहेत. या मिळकत मालकांकडून जनरल मुखत्यार असल्याने त्यांच्या मध्यस्थीने हा व्यवहार केला. दरम्यान, २८ एप्रिल २०११ ते २० मार्च २०२४ या कालावधीत दुय्यम निबंधक कार्यालय नाशिक-१ व दुय्यम निबंधक कार्यालय नाशिक-७ येथे शेरबानाे सल्लीम अत्तार यांनी वाटणीपत्रामध्ये अत्तार सल्लीम महंमद या जनरल मुखत्यारधारकाच्या माध्यमातून अत्तार सादिक दाऊद खान, अत्तार हाजी गफूर पापा, अत्तार युनूस चांदखाँ विविध इसमांना जनरल मुखत्यार म्हणून नोंदणीकृत वाटपपत्रामध्ये सामील केले. तसेच सदरचे विविध जनरल मुखत्यारपत्र नोटरी ॲड. ए. आय. शेख यांची बनावट सही करून ते नोटरी त्यांच्याकडे नोंद केेल्याचे दाखविले.
त्यानंतर संशयित आरोपी शेरबानो व त्यांच्या वारसांनी फिर्यादी बंब यांच्याबरोबर केलेले साठेखत रद्द न करता अथवा त्याची कोणतीही पूर्वसूचना न देता, तसेच फिर्यादी बंब यांच्याकडून घेतलेले ५० लाख रुपये परत न करता त्यांच्या वाट्यापैकी २० गुंठे जागा २० मार्च २०२४ रोजी हरिष कटारिया, अनिषा कटारिया, तनुजा कुकरेजा व अतिक खतीब या त्रयस्थ व्यक्तींनी खरेदी देऊन फिर्यादी बंब यांची फसवणूक केली. याप्रकरणी बंब यांनी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.
याप्रकरणी संशयित शेरबानो सलिम अत्तार व तिचे वारस अतिक सलिम अत्तार, रियाज सलिम अत्तार, अकिल सलिम अत्तार, अश्पाक सलिम अत्तार, आसिफ सलिम अत्तार, सायराबानो मुक्तार अत्तार, मिनाज राजूखान अत्तार व बनावट नाेटरी करणारे अत्तार सलिम महंमद, अत्तार सादिक दाऊद खान, अत्तार हाजीगफूर पापा, अत्तार युसून चाँद खान व २० गुंठे जमीन फसवणूकीने खरेदी घेणारे हरिष कटारिया, अनिषा कटारिया, तनुुजा कुकरेजा व अतिक खतीब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
---